नाही कशाला सर विषाची

नाही कशाला सर विषाची

घ्यावी परीक्षा तर विषाची

जीवन जरा मंथीन, म्हणतो 

चव सांग मजला, हर, विषाची

 
नवखा नको समजूस, साकी

रिचवीन मी घागर विषाची  

 
आयुष्य हे धुंदीत गेले

(जगण्यात पडली भर विषाची) 

 
बोलायचो मी गोड पूर्वी

आली दया बेघर विषाची 

 
अवहेलनेला झेलल्यावर

पर्वा कुणा चिल्लर विषाची?  

 
दु:खाहुनीही वेदनामय

सांत्वनरुपी फुंकर विषाची

 
मरुनी न सॉक्रॅटीस मेला

ही हार मातब्बर विषाची