''चुकले माझे''

समजुन येते ज्याचे त्याला, "चुकले माझे"
धमक लागते म्हणावयाला "चुकले माझे"
लाख चुका पदरात घ्यावया तयार आहे
फ़क्त एकदा बोल तयाला ," चुकले माझे"
पश्चात्तापातील मजा का मिळेल त्याला?
चुकून जो ना कधी म्हणाला,''चुकले माझे''
भ्रमात राहू नकोस की हे जगत नासमज
कधी तरी समजेल जगाला,''चुकले माझे''
दिशादिशांनी दबाव ''कैलास'' येत आहे
निरपराध मी म्हणू कशाला? ''चुकले माझे''
--डॉ.कैलास गायकवाड