फॉर्म आणि क्लास

'फॉर्म इज टेम्पररी, बट क्लास इज पर्मनन्ट' असे बहुतेक वेळा क्रिकेटच्या संदर्भात म्हटले जाते. 'आता आपण निवृत्त झालेले बरे, आपला गावसकर होऊ देऊ नका....' असे सल्ले मिळालेला आणि मुश्किलीने संघात पुन्हा जागा मिळालेला एखादा डावखुरा फलंदाज खेळायला येतो, त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याची चूक गोलंदाज करतो आणि ऑफ साईडच्या सहा क्षेत्ररक्षकांना जागेवरून हालण्याचीही उसंत मिळत नाही. एखाद्या बाणासारखा चेंडू सीमारेषेबाहेर जातो. "ऑन दी ऑफ साईड, फर्स्ट देअर इज गॉड, अ‍ॅन्ड देन देअर इज ही' हे त्याच्याच तोलामोलाच्या भिंतीसारख्या मजबूत खेळाडूने त्याच्याविषयी म्हटलेले वाक्य आठवते. 'फॉर्म इज टेम्पररी, बट क्लास इज पर्मनन्ट...'
'यांच्या कथा म्हणजे मराठी साहित्यातला एक मानदंड आहे, पण आता असल्या दृष्टांत कथा वगैरे लिहिण्यापेक्षा त्यांनी लिहिणे थांबवावे..' असा अनाहूत सल्ला कुणी समीक्षक देतो. त्या लेखकाने नाहीतरी लेखन थांबवलेलेच असते. 'हे कोण बोलले बोला..' हे ऐकायलाही तो लेखक थांबत नाही. 'तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा, मी तर चाललो' असे म्हणून तो मावळतीच्या दिशेने निघून जातो. आणि मग त्याची पत्रे, त्याचे एखादे अरभाट पुस्तक प्रसिद्ध होते आणि वाचक अवाक होऊन बघत राहतात. 'फॉर्म इज टेम्पररी, बट क्लास इज पर्मनन्ट....'
जाडजूड मद्राशी बांधा, सदोष हिंदी उच्चार, कामाची आणि सहकलाकारांची सरधोपट निवड या सगळ्यासह ती लोकप्रियता मिळवते. काही ठिकाणी रसिकांची वाहवाही मिळवते. वयानुसार आणि शिरस्त्याप्रमाणे वादग्रस्त लग्न करून पडद्याआड निघून जाते. 'या वयातही तिने स्वतःला कसे 'मेन्टेन' केले आहे' यासारख्या देवानंदी पेज थ्री बातम्यांव्यतिरिक्त तिची काही आठवण शिल्लक राहत नाही. पंधरा वर्षे उलटतात. अनपेक्षित रीत्या पडदा किलकिला करून ती बाहेर डोकावते आणि तिच्या तेजाने आसमान उजळून निघते. तिच्या देहबोलीने काळ थबकल्यासारखा होतो. तिच्या अस्तित्वातली 'ग्रेस' पडदा भरून उरते. निर्बुद्ध हाणामारी आणि उथळ करमणूक हेच आता आपल्याला बघत राहावे लागणार असे वाटत असतानाच एक वसूल परफॉर्मन्स बघायला मिळतो. मन तृप्तीने भरून जाते. 'फॉर्म इज टेम्पररी, बट क्लास इज पर्मनन्ट...'
चुकवू नका, रसिकहो, चुकवू नका. 'फॉर्म इज टेम्पररी, बट क्लास इज पर्मनन्ट......'