माझे खरे कुणाशी कसलेही भांडण नाही!
माझ्या विषण्णतेला कुठलेही कारण नाही!!
होता खरा हिरा जो, त्याचीही परवड झाली;
आले कधीच त्याच्या वाट्याला कोंदण नाही!
चाहूल आज वारा कसलीही आणत नाही;
दूरातही कुठेही किणकिणते काकण नाही!
जाळून जिंदगानी केलेले चिंतन आहे!
हे वांझ घोषणांना सुचलेले भाषण नाही!!
येवून ठेपलेली दाराशी आज दिवाळी....
भिंती सुन्या सुन्या अन् दाराला तोरण नाही!
आयुष्य नेत आहे....मी तिकडे धावत आहे!
धरबंद त्यास नाही, मजलाही धोरण नाही!!
इतके नकोस देऊ कर्जाऊ श्वास मला तू....
माझ्याकडे पुरेसे कुठलेही तारण नाही!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१