हृदयात वंचनेचा ताजा प्रहार होता

हृदयात वंचनेचा ताजा प्रहार होता
अश्रूंस पापण्यांचा पण धाक फार होता

डोळ्यांमधून आसू आलेच ओघळूनी
ग्रीष्मास तू दिलेला हळवा बहार होता

जे दाटले मनाशी ते येइनाच ओठी
शब्दास भावनेने दिधला नकार होता

समजाविलेस मजला‘विसरुन जा म्हणे तू’
मेल्यास मारण्याचा भलता विचार होता

ते हासणे खरे की,ही वंचना नव्याने
मी भक्ष तू शिकारी असला प्रकार होता

वळलो नव्या दिशेला काहीच का दिसेना
पाऊस त्या घडीला भलता उदार होता

संधीस आठवांचा खग एक एक आला
त्यांच्या विसावण्याला माझा रुकार होता

उ. म. २०१२.