कुंचला

........................
कुंचला
........................

मी कसाबसा आपला आहे!
खेद याचा कुठे मला आहे?

तू हसावेस रडू येताना...
फार नाजूक ही कला आहे!

स्वस्थ अजिबात बसू देईना...
कोण ही कोण चंचला आहे?

मी तुझा जरासाच आभारी...
मी जरासाच चांगला आहे!

सांगतो खूप खूप हा काही...
हा किती मूक गल्बला आहे!

रेखतो मी नभावरी चित्रे...
पाहणे हाच कुंचला आहे!

प्रदीप कुलकर्णी

................................
रचनाकाल ः 31 डिसेंबर 2012
................................

सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...उद्या भेटूच. :)