गझल
गझल लिहिताना किती होतात सांगू यातना!
जीव घेणाऱ्या कळा अन् ठणकणाऱ्या वेदना!!
जे बरे वाईट घडते, पोचते हृदयामधे......
अंतरंगी एक जागृत दिव्य होते चेतना!
कैक हौशी लोक लिहिती गझल जोमाने किती!
मात्र गझलेची कुणाला समजली संकल्पना?
माणसांमधल्या पशूचे केवढे थैमान हे!
राहिल्या आहेत कोठे मानवी संवेदना?
आज जो तो ओरबाडू पाहतो जे जे हवे;
कोठले आर्जव, कशाची कोण करतो याचना?
चालला व्यवहार नुसता एकमेकांच्यामधे.....
आपलेपण, प्रेम, आस्था, कोणती ना भावना!
घेवुनी पोटास चिमटे, घास दुसऱ्यांना दिले......
पदरमोडीच्या कपाळी मात्र आली वंचना!
राजकारण, देशसेवा फक्त नुसते आव हे!
कान किटले ऐकुनी दररोज त्यांच्या वल्गना!!
फक्त माझा देव अन् मी जाणतो दोघेच हे......
माझियासाठी न करतो मी कधीही प्रार्थना!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१