बायको होता तुझी झाली सुरू ही भूमिका,
शेवटी संपायला आलीच ही एकांकिका.
पात्र मी ना तुज जरी, वाटे अपेक्षा बेगडी,
आपल्या दोघात ही वेड्या क्षणांची नाटिका.
शाप भोगायास आता ना उरे माझ्यात मी,
तू तरी आरोप केले ही खरी शोकांतिका.
सोडले माझे रखाने तू तुझ्या ओळीत का?
मोडल्या डोळ्यात माझ्या या प्रश्नांची धारिका.
वाटते जेव्हा मनाला या जगी मी एकटी
आठवावी का मला तू भेटलेली वाटिका?
दाटली मेंदीत ओल्या कोरडी आशा तुझी,
ना कधी संपेल वेड्या भावनांची मालिका.