तरही गझल
ठाकला मृत्यू, तरी मस्तीत मी!
(आज आलो नेमका शुद्धीत मी!!)
ना पिताही प्यायलेला वाटतो....
कोण जाणे कोणत्या धुंदीत मी?
कोकणस्थी काय केली बायको....
जिंदगी जगलो किती शिस्तीत मी!
ना कुठे येणे, न जाणे ठेवले;
वागलो परक्यापरी वस्तीत मी!
मायबोलीचा अखाडा जाहला....
ह्यापुढे दिसणार ना कुस्तीत मी!
बिंबही माझेच अन् ज्योतीत मी!
सूर्य सुद्धा मीच अन् पणतीत मी!!
सारख्या तोंडावळ्यांचे कैकजण....
यायचा ना ओळखू गर्दीत मी!
सिद्धता देतील येणाऱ्या पिढ्या!
शेवटी सिद्धांत वादातीत मी!!
मान तू किंवा भले धुडकाव तू!
एक आहे सत्य कालातीत मी!!
-------प्रा.सती=श देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१