बोललो मी काय मजला याद नाही!

गझल
बोललो मी काय मजला याद नाही!
जीवना, माझा तुझ्याशी वाद नाही!!

काजव्यांना का म्हणावे सूर्य आम्ही?
आज गझलेचा कुणी उस्ताद नाही!

मागतो प्रस्तावना तू पुस्तकाला....
एवढा अद्याप मी वस्ताद नाही!

सारखा कानास मोबाईल आहे!
मात्र कोणाशी कसा संवाद नाही?

रोग हृदयाचा कसा त्यांनाच होतो?
ज्या बिचाऱ्यांना कशाचा नाद नाही!

पोटची पोरे भलेही ना विचारो....
शिष्यप्रेमाला अम्ही मोताद नाही!

कालचक्राचे नियम असतात काही;
तू फुला, त्याला कुणी अपवाद नाही!

मायबोली काय ही मुर्दाड झाली?
चांगल्या शेरास सुद्धा दाद नाही!

वाहवा मी सांग त्यांची का करावी?
रंग नाही, गंध नाही, स्वाद नाही!

काय तुज कळणार गोडी अमृताची?
घेतला अद्याप तू आस्वाद नाही!

व्हायचे ते एकदा होवून गेले....
ह्या मढ्याची एकही फिर्याद नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१