पाठीवरीच माझ्या माझे बिऱ्हाड आहे!

गझल
पाठीवरीच माझ्या माझे बिऱ्हाड आहे!
वस्तीत मीच माझ्या इतका उनाड आहे!!

दोघे पुन्हा लपेटू एकांत रेशमी हा;
वारा बराच हल्ली झाला लबाड आहे!

जे पाहिजे तुला ते, तू वाच पान माझे....
पुस्तक तुझ्याचसाठी उघडे सताड आहे!

मी नाइलाज म्हणुनी लिहिलेत शब्द काही;
सांगायचे मला ते शब्दांपल्याड आहे!

एकेक शेर माझा मज तोंडपाठ आहे!
हृदयात शायरीचे संपूर्ण बाड आहे!!

आणू कुठून भ्रमरा मकरंद द्यायला मी?
ही कागदी फुलांची वस्ती उजाड आहे!

जो व्हायला नको तो होतोच बोलबाला!
गजरा तुझ्या फुलांचा भारी चहाड आहे!!

सावर स्वत:स अन् तो आवर पदर खुबीने....
ही झुळुक कोवळीही भलतीच द्वाड आहे!

ती झुंजली स्वत:च्या अब्रूस वाचवाया.....
अबला नव्हे अरे ती, जग मात्र भ्याड आहे!

त्या कोवळ्या कळीला नव्हतीच कल्पना ही....
वेषात माणसाच्या जो तो गिधाड आहे!

इतका नकोस मिरवू तोरा खळाळण्याचा....
आहेस तू नदी तर, मीही पहाड आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१