कुणास ज्ञात तुझी आज थोरवी नाही!

गझल
वृत्त: कलावती
लगावली: लगालगा/ ललगागा/लगालगा/गागा
........................................................

कुणास ज्ञात तुझी आज थोरवी नाही!
कधी उपेक्षित होणार पालवी नाही!!

हरेक शब्द तुझा दरवळे सुगंधाने.....
तुझा सुगंध, तुझा बाज मानवी नाही!

जरी अपेक्षित आहेत मागण्या काही;
जगा! हरेक तुझी आस वाजवी नाही!

तुम्हास ओळखतो, लोकहो! पुरेसा मी;
करा खुशाल टवाळी....मला नवी नाही!

हरेक धर्म शिकवतो धडेच प्रेमाचे!
विरुद्ध धर्मगुरू, पोप, मौलवी नाही!!

बराच काळ तुझी पायपीट जी चालू.....
द्रवेल देव अशी चाल नागवी नाही!

दिसावयास दिसे वेष फक्त साधूचा....
तपासल्यावर निष्ठाच साधवी नाही!

अखेरचाच अता श्वास राहिला माझा!
अजून गात कशी कोण भैरवी नाही?

दिसावयास किती ऐटबाज त्या गझला!
गझल जगेल खरोखर असा कवी नाही!!

कधी तरी उगवावा असा दिवस येथे......
कुणामधेच कशाचीच यादवी नाही!

अशी अजून न दिसली मला कुणी व्यक्ती......
जिच्यातली कुठली गोष्ट लाघवी नाही!

कथेत ऐकत आलोत राम-सीतेला!
समक्ष मात्र कुठे राम-जान्हवी नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१