मधाळ चोखनी
पाऊस कधी कधी असा
तान्हुल्याची मधाळ
चोखनी जसा
सुरवातीला बरसून जातो
आशांना धुमारे फोडून जातो
डोळ्यांच्या ओठांनी आम्ही
स्वप्नांना चाखत राहतो
अन् भाबड्या समजुतीत
गुंगून जातो
चोखून चोखून
ओठ येतात दमून
पोटात जठराग्नी
धगधगतो भडकून
आशेचा धुमारा मग
करपून जातो
नयनांचा मुका टाहो
पाणदेव पाहतो
शेवटी लोचनांतल्या स्वप्नांचा
असा बुडबुडा फुटतो
दडी मारलेला पाऊस
मग डोळ्यांतून झरतो.....
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.