अद्वैतची इतिहासाची अभ्यासपुस्तिका
धडा १ - भारतीय उपखंड आणि इतिहास
* 'घरांचे प्रकार' मधले सगळ्यात वरच्या वा खालच्या घराचे चित्र चांगले काढता आले तर रोटरी/लायन्स क्लबच्या चित्रकला स्पर्धेत बक्षीस नक्की मिळते.
* 'आपले घर पाडून कौलारू घर बांधू' असे फार वेळा म्हटले तर बाबा चिडतात. आई चिडत बसत नाही. थेट एक धपाटा घालते.
* 'डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते' हे खरे नसावे. अर्चितचा एक लांबचा मामा महाबळेश्वरला डोंगरात रहातो. त्याचा बंगला एवढा मोठा आहे की बंगल्यातल्या बंगल्यात हिंडायला त्याला स्कूटर वापरावी लागते असे अर्चित म्हणतो.
पण मार्क मिळवायचे असतील तर पुस्तकातले वाक्य पाठ ठेवलेले चांगले.
* भारताचे सहा भूप्रदेश पाठ असले तर परीक्षेत दोन मार्क नक्की मिळतात.
* बांगलादेशचे आधीचे नाव पूर्व पाकिस्तान होते. हे पुस्तकात नाही, पण जंगमसर केव्हातरी विचारतात.
देशांची नावे बदलण्याची पद्धत वाईट आहे. वेगवेगळी नावे पाठ करावी लागतात. आणि देशांची नावे बदलूनही माणसे तीच राहतात.
* हिमालय पर्वताचा फोटो खोटा वाटतो पण तो खरा आहे. तसेही परीक्षेत त्याचा काही उपयोग नाही.
* खैबर खिंडीच्या फोटोतला रस्ता वेडावाकडा बांधण्यापेक्षा "एक सरळ फ्लायओव्हर का नाही बांधला?" असे विचारू नये. घरी बाबा अक्कल काढतात नि वर्गात महाजन सर शिक्षा म्हणून रामरक्षा म्हणायला लावतात.
* गंगा नदीचे चित्र म्हणजे फोटो नाही, रंगवलेले चित्र आहे. पण काढायला फार कठीण आहे.
आणि काढलेच तरी चित्रकला स्पर्धेत बक्षीस मिळत नाही.
* थरच्या वाळवंटाचा फोटो छान आहे. घर बांधण्यासाठी वाळू वापरण्यापेक्षा त्या वाळूचे एक वाळवंटच बांधावे हे मोठ्या माणसांना पटत नाही.
* 'भारत प्राकृतिक' हा नकाशा नीट पाठ करावा. विशेषतः खैबर खिंड नि बोलन खिंड यात कुठली उत्तरेला नि कुठली दक्षिणेला हे नीट लक्षात ठेवावे.
घटक चाचणीत विचारतात.
* नकाशात श्रीलंकेचा आकार मोदकासारखा दिसतो.
श्रीलंकेत गणेशोत्सवात डीजे आणि लेझर दोन्ही वापरायला परवानगी आहे असे अनिकेतदादा म्हणतो. श्रीलंका रावणाचा देश असल्याने तिथे गणेशोत्सव साजरा करत नाहीत असे अनघाताई म्हणते. त्यावर रावणाचे भांडण रामाशी होते, गणपतीशी नव्हते असे अनिकेतदादा म्हणतो.
मग दोघेही आपापल्या फोनकडे बघत "रेंज नाही नीट" असे म्हणत गच्चीवर जातात.
त्यांच्यामागे गेले तर अनिकेतदादा चॉकलेट देतो. पण चॉकलेट नसले तर फटके देतो.
काही दिले तरी गच्चीचे दार लावून घेतो. रावण केव्हांच मेला हे त्यांना ठाऊक नसेल काय?
* अंदमान बेटाचे चित्र फोटोशॉपमध्ये केले आहे असे अन्वयचा दादा म्हणतो. पण ते खूप छान दिसते.
एवढा स्वच्छ समुद्र म्हणजे फोटोशॉपच असणार.
* अंदमान निकोबार बेटे भारतापासून खूप लांब आहेत. त्यांच्यापेक्षा जवळचे श्रीलंका भारताने आपल्या ताब्यात घेतले असते आणि श्रीलंकेतल्या लोकांना अंदमान निकोबारला पाठवले असते तर सरकारचे खूप पैसे वाचले असते आणि रामायणही घडले नसते.
पण रामाने अंदमानमध्येही जाऊन लढाई केली असती. त्याला काय, मारुतीच्या खांद्यावरूनच जायचे होते. आणि लढाई जिंकल्यावर परत यायला विमान.
* हडप्पा संस्कृती आणि 'दिल बोले हडिप्पा' या सिनेमाचा काही संबंध नाही असे जंगमसर म्हणतात.
हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी तो सिनेमा पाहून मग आपल्या संस्कृतीचे नाव ठेवले असे शेजारचा अथर्वदादा म्हणतो. त्याला त्या सिनेमातली शर्लिन चोप्रा आवडते. तिचे खूप फोटो त्याच्या मोबाईलवर आहेत. त्यातल्या बऱ्याचशा फोटोंत तिचे कपडे खूप कमी आहेत.
त्याच्या मोबाईलचा स्क्रीनलॉक कोड 1234 आहे.
* स्वाध्यायमधल्या प्रश्नांची उत्तरे पाठच केलेली चांगली. समजून घ्यायला गेले तर काही कळत नाही आणि मार्कही जातात.
* 'मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो?' या प्रश्नाचे उत्तर 'फ्लॅटमध्ये किंवा बंगल्यात' असे लिहू नये. शंभर वर्षांपूर्वीपर्यंत म्हणे फ्लॅट्सच नव्हते. आणि दोनशे वर्षांपूर्वीपर्यंत बंगले. तेव्हां लोक कुठे राहत असतील कळत नाही.
त्यामुळे 'जगण्याच्या साधनांची मुबलकता असेल तिथे' हे उत्तर लिहावे. मार्क मिळतात.
जगण्याची साधने दुकानांत मिळतात हे लिहिल्यास मार्क मिळत नाहीत.
* कारणे लिहा या प्रश्नामध्ये 'इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते' याचे कारण लिहिताना इतिहासाचे जंगमसर आणि भूगोलाच्या आवारेबाई यांच्या बद्दल लिहू नये. दोघेही मारतात.
'लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते' याचे कारण 'मॉलमध्ये जाण्यासाठी' असे लिहू नये. आपल्या गावात मॉल नाही हे खरे आहे, पण परीक्षेत खरे लिहून मार्क मिळत नाहीत.
* गंगा आणी ब्रह्मपुत्रेचा संगम आपल्या देशात होत नाही. त्यामुळे तो कुठे होतो हा प्रश्न परीक्षेत विचारत नाहीत.
* जपान हे बेट आहे. आणि ते भारताच्या पूर्वेला आहे. पण 'भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत?' या प्रश्नाच्या उत्तरात जपान लिहिले तर मार्क मिळत नाहीत.
"तू उद्या पूर्वेकडच्या बेटांच्या यादीत ऑस्ट्रेलियाही घालशील" असे जंगमसर म्हणतात. पण त्यात चुकीचे काय ते सांगत नाहीत.
* 'उपक्रम' मध्ये दिलेले "तुमच्या परिसरातील जलाशयांविषयी माहिती मिळवा" हे तळ्याकाठी खेळायला जाताना कारण सांगायला चांगले आहे.
* 'विविध वेशभूषा' या चित्रांतली सरदारजीची वेशभूषा फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी छान आहे. तसे ड्रेस पुण्याला भाड्याने मिळतात. आणि आपल्या गावातल्या रंगनिकेतन मधले मेकपचे काम बघणारे मोघेकाका दाढीमिशी छान लावून देतात.
मिशी चिकटवली की मज्जा वाटते. कधीकधी शिंका येतात तेव्हां मिशी दाबून धरून मग शिंकावे. नाहीतर मिशी सुटते आणि ती परत चिकटवायला मोघेकाका जवळपास नसले तर नुसती दाढी उरते.
मग सरदारजीऐवजी ओवैसीसारखा चेहरा दिसतो असे बाबा म्हणतात. ओवैसी वाईट आहे असे आजी म्हणते.
धडा २ - इतिहासाची साधने
* आजी-आजोबांच्या काळातल्या वस्तूंची यादी करताना त्यात 'आजोबांचा चष्मा' ही वस्तू चालत नाही. आजोबा म्हातारे असले तरी चष्मा नवीन आहे.
आजोबांचा सेलफोनही चालत नाही. तो सेलफोन वेगळाच आहे. त्याच्या स्क्रीनवर कितीही बोटे घासली तरी काही होत नाही. आणि त्या फोनला अक्षरे नि आकड्यांची बटने आहेत.
'आजोबा' हीच वस्तू म्हणून चालेल का असे विचारल्यावर आजी फार हसते.
* वास्तू म्हणजे घर. गावातल्या जुन्या वास्तूची माहिती गोळा करण्यासाठी जहागिरदारांच्या गढीकडे जाऊ नये.
त्यांचा कुत्रा चावरा आहे. आणि बांधलेला नसतो.
* पूर्वीच्या काळी धान्य भाजताना काही कण जळत असत. पूर्वीच्या काळी गॅस नव्हता असे आजी म्हणते. मग धान्य कसे भाजत असतील? आग पेटवून?
गच्चीवर आग पेटवायचा प्रयत्न करू नये. धूर दिसला की शेजारच्या बंगल्यातले कुलकर्णीकाका आरडाओरडा करतात. मग आई घरी असली तर गच्चीत येऊन फटके देते.
ती नसली तर ती आल्यावर कुलकर्णीकाका परत आरडाओरडा करतात.
* स्तूप हा एक बांधकामाचा प्रकार आहे. एवढे चांगले नांव खरे तर खाण्याच्या पदार्थाचे असायला हवे होते.
* मंदिरांच्या भिंती, लेण्यांच्या भिंती वगैरे ठिकाणी कोरलेले चालते. घराच्या भिंतींवर कोरायचा प्रयत्न करू नये. कोरणे सुरू करण्याआधीच आई मारायला तयार असते.
मंदिरांच्या नि लेण्यांच्या भिंतींवर कोरणाऱ्यांना आई नसावी बहुधा. गरीब बिचारे.
* पूर्वीच्या काळी भूर्जपत्रांवर लिखाण करीत असे इतिहासाच्या पुस्तकात आहे. भूर्जपत्रे काश्मीरमध्ये मिळतात. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी काश्मीरला जायला हवे.
पण हे बाबांना पटत नाही. ते दर सुटीला सांगलीलाच नेतात. सांगलीत भूर्जपत्रे मिळत नाहीत.
* 'शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात लोकगीत सादर करा' असे पुस्तकात लिहिले असले तरी तसे करू नये. सगळी मुले हसतात.
* पुस्तकात दिलेल्या जुन्या लोकगीतात विक्रमादित्य ऐवजी इक्राम लिहिलेले चालते. पण अशी चूक पेपरात केलेली चालत नाही. शुद्धलेखनाची चूक म्हणून मार्क कापतात.
* शेजारच्या जैनकाकांचा चष्मा हा जैन साहित्य म्हणून सर मान्य करीत नाहीत. जैन साहित्य म्हणजे जैन नावाच्या माणसाच्या मालकीची वस्तू नव्हे असे ते म्हणतात.
"जैन साहित्य म्हणजे काय?" असे विचारले तर "गप्प बस" असे म्हणतात.
* 'प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने' हा परिच्छेद समजायला अवघड आहे. आणि पाठ करायला त्याहून अवघड. परीक्षेत यावर प्रश्न आला तर देवाचे नाव घ्यावे आणि पुढच्या प्रश्नाकडे जावे.
* 'तुम्हांला एक जुने नाणे सापडले. तर काय कराल? स्वतःजवळ ठेवाल, पालकांना द्याल की वस्तुसंग्रहालयात जमा कराल.' हा प्रश्न चुकीचा आहे.
स्वतःजवळ ठेवले तर आईला लगेच सापडेल. पालकांना दिले तर "कुठून कचरा आणतोस नेहमी?" असे ओरडतील. आमच्या गावात वस्तुसंग्रहालय नाही.
मी ते नाणे बॅंकेत जमा करीन. बॅंकेत 'जुन्या आणि फाटक्या नोटा घेऊ' असा बोर्ड आहे. म्हणजे जुने नाणेही घेतील.
बाबांची नजर चुकवून कॅशियरकाकांकडे जाईन.
* स्वाध्यायात मातीच्या भांड्यांच्या प्रतिकृती करायला सांगितल्या असल्या तरी तसे करू नये.
बागेतल्या मातीचा चिखल होतो पण त्या चिखलाची भांडी होत नाहीत. फक्त कपड्यांवर डाग पडतात. आणि "दाग अच्छे है" असे म्हटल्यावर आई फटके देते.
* इतिहासाच्या पुस्तकात पाढे पाठ करून त्यांचे सादरीकरण करायला सांगणे हा अन्याय आहे. पण पोलिस त्याबद्दल तक्रार ऐकून घेत नाहीत.
संग्राम मेडिकलच्या चौकात एक पोलिसकाका उभे होते. मी त्यांना या अन्यायाबद्दल सांगितले पण त्यांनी लक्ष दिले नाही. मी परत सांगितल्यावर "पंतप्रधानांना सांग" असे ते ओरडले.
मला whatsapp वापरता येते पण पंतप्रधानांचा नंबर माझ्याकडे नाही.
हे चुकीचे आहे. मी पंतप्रधान झालो तर चौकाचौकातून फ्लेक्सवर माझा फोन नंबर लिहीन.