ज्यांना स्व. सुरेश भटांच्या गज़ल आणि कवितांमधील ' धग' जाणवली असेल, त्यांना स्व. सुरेश भटांना वाहिलेली, माझी ही काव्यमय श्रद्धान्जली नक्कीच समजेल, आणि कदाचित आवडेल सुद्धा !
--------------------------------------------------------
सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये !
सावलीच प्रिय असणाऱ्यांनी, उन्हात पाऊल ठेऊ नये,
अन 'धग' सोसवत नाही, त्यांनी सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये !
आखीव-रेखीव जगतात, त्यांनी ह्या 'कलंदराला' तोलु नये,
अन विहिरीतील मंडूकांनी , सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये !
कवाडेच बंद ठेवतात, त्यांनी प्रकाशाची तिरिप मागु नये,
अन सुर्यालाच नाकारतात, त्यांनी सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये !
चेहरेच लपवितात, त्यांनी कधीही आरश्यात पाहु नये,
अन मुखवट्यात वावरतात, त्यांनी सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये !
फ़ुंकर घालताच कोसळतात, त्यांनी वादळाला आव्हान देऊ नये,
अन कागदी घोडे नाचविणाऱ्यांनी, सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये !
सुईलाच घाबरतात , त्यांनी दुधारी तलवार मागु नये,
आणि 'एल्गार' पाहुनच पळतात,त्यांनी सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये !
-- मानस६