रेवा घरी पोहचली तेंव्हा घडला प्रकार आईला सांगावा की नाही ह्याबाबत ती गोंधळात होती- सांगावे तर ती रोज काळजी करीत राहील -न सांगावे तर स्वतःचे मन खात राहील. शेवटी न सांगण्याचा निर्णय तिने घेतला - आईची तब्येत सांभाळणे मनाच्या भावनांपेक्षा महत्त्वाचे होते...
वासंती दुसऱ्या दिवशी ऑफिसला आली नव्हती- काल काय घडले ते कोणाला तरी सांगण्यासाठी रेवा उतावीळ झाली होती. बाजूच्या टेबलावर बसणाऱ्या मोकाशींचा स्वभाव जरा बरा होता. मध्यमवयीन हा गृहस्थ रेवाला कधी मधी आपल्या वाटणीचे काम करायला मदत मागी. मोकाशींना काय घडले ते तिने मोघम सांगितले तेंव्हा मोकाशी रेवाच्या तोंडाकडेच पाहतं राहिले.
'रेवती, काळजी घ्या, त्या माणसाने मार खाल्लेला आहे तो तिसऱ्याच्या हातून - डूख तुमच्यावर नको ठेवायला!'
रेवाने मनातल्या मनात कपाळावर हात मारला- दुपारी जेवणाच्या सुटीत वासंतीला घरी फोन करून सांगायचे रेवाच्या मनांत आले पण वासंतीच्या वाटणीचे काम तीच्या डोक्यावर येऊन पडल्याने जेवण कसेबसे आटपून ती कामाला लागली ते घरी जाण्यासाठी जिना उतरताना ती गोष्ट तीच्या लक्षात आली.... परत तोच स्टॉप समोर बघून रेवाच्या मनात धस्स झाले. मोकाशींचे बोलणे अचानक तिला आठवले व एका वेगळ्याच भावनेने तिचे शरीर शहारून गेले.... पण काल पेक्षा गर्दी अधिक होती व बसही लवकर आल्याने रेवाला जास्त काळजी करावी लागली नाही.
वासंती दुसऱ्या दिवशीही न आलेली बघून रेवाला आश्चर्यापेक्षा काळजी वाटू लागली. मग तिने वासंतीला घरी फोन केला. वासंतीच्या बाबांनी फोन उचलताच रेवाला नवल वाटले त्यांनी रेवाला वासंती आठ दिवसासाठी गावाला काही कामानिमित्त गेल्याचे सांगितले. मोकाशींना ती त्याबद्दल बोलली-
'पण तिने फोन तर करायचा होता ऑफिस मध्ये !' त्यांनी स्वतःची नाराजी दर्शवली.
दुपार झाली व रेवा कामांत असतानाच कुरियर वाल्याने रेवाच्या टेबलावर एक पाकीट आणून ठेवले - ऑफिसच्या पत्त्यावर पत्र आलेले पाहून रेवाला नवल वाटले... जेमतेम पोहचपावतीवर सही करून तिने अक्षर बघितले तर वासंती सारखे भासले... घाईघाईत तिने पाकीट उघडले - बघते तर वासंतीचेच ! सोबत एका कागदावर तिचे राजीनामापत्र.
वासंतीच्या वडिलांनी तिला राजच्या भानगडीमुळे काही दिवस गावी पाठवून देण्याचा निर्णय घेतलेला होता म्हणून वासंती कावलेली होती. परत चांगली नोकरी मिळेल की नाही व आता वडील सरळ लग्नच लावतील अशी भिती तिला वाटत होती.
मोकाशींना तिने फक्त राजीनामा दाखवला- मोकाशी माणूस बरा होता त्याने जरा विचार केला मग वासंतीची रजा किती शिल्लक आहे ते पाहून 'तिला आपण आठवड्याची रजा देऊया कदाचित तोवर तिचा नोकरी सोडायचा विचार बदलला तर बिचारीचे नुकसान व्हायला नको'.
दोन दिवसांनी रेवाने परत वासंतीच्या घरी फोन केला, तीच्या आईने पूर्ण रामकहाणी सांगितली , वासंतीचे वडील राज प्रकरणावरून जाम उखडलेले होते. त्यांनी दोघांना एकत्र पाहिले व तत्काळ वासंतीची रवानगी गांवी केलेली होती. तीच्या आईला धक्काच बसला होता - वासंतीचा फोन आल्यास ऑफीसला फोन करण्याची विनंती रेवाने त्यांना केली....
दुपारी वासंतीच्या वडिलांचा फोन आलाच !
वासंती नोकरी सोडत आहे व कारण हे वैयक्तिक असल्याचे त्यांनी सरळ डायरेक्टर साहेबांनाच सांगितल्याने पुढचा प्रश्नच मिटला होता...
ह्या सर्व घटना इतक्या वेगवान व नाट्यमय रितीने झाल्या होत्या की, रेवा बसस्टॉप प्रसंगाबद्दल साफच विसरून गेली होती.....
एका सायंकाळी ऑफिसमध्ये खास काम नाही म्हणून तिची वेळेवर सुटी झाली. इतर पोरींबरोबर गप्पा मारत ती स्टॉपवर पोहचली, तितक्यात मोटर सायकलवर बाजूलाच उभ्या असलेल्या त्या युवकाकडे तिचे लक्ष गेले.
आभारप्रदर्शनाचा अर्धवट राहिलेला कार्यक्रम पूर्ण करायचा विचार करून 'एक मिनिटात आले ग !' म्हणत ती त्याच्याकडे चालू लागली. तिला येताना पाहून मंद स्मित त्याच्या चेहऱ्यावर आले.
'आपण त्या दिवशी मला खरोखर खूप मदत केलीत व मी आपले आभार मानायचा कृतज्ञपणा दाखवू शकले नाही.'
'मग आजचा मुहूर्त छान आहे त्यासाठी ! लवकर धन्यवाद दे म्हणजे तुझ्या मैत्रीणी ज्या डोळे विस्फारून इकडे बघत आहेत त्यांची सुटका होईल'
अनावधाने रेवाने मागे वळून पाहिले.... खरोखरच तिघीच्या तिघी टक लावून तिकडेच पाहतं होत्या. त्याही परिस्थितीत रेवाला हसू आवरेना....
तिला हसताना पाहून तो लगेच बोलला 'तुझे धन्यवाद तू घरी पोहचलीस तेंव्हाचं माझ्यापर्यंत पोहचले'
'आपले नांव नाही कळले'
'तू कुठे तुझे नाव सांगितलेस ?'
....लांबून बस येताना पाहून सुटका झाल्याची भावना तीच्या चेहऱ्यावर उमटली.....
आता मागे वळून पाहण्याची पाळी त्याची होती.....
'तुझी बस येतेय - पुढची बस अर्ध्या तासाने आहे'
'बापरे, मी पळते.... बाय द वे, मी रेवा, रेवती मराठे !'
त्याने पुढचे काही बोललेले ऐकू येण्याच्या नेमक्या वेळेलाच बाजूने जात असलेल्या कारने कर्कश्य हॉर्न वाजवला....
'कोण ग तो ?'
"अग सोमवारी माझी...... " अन रेवाने पूर्ण कहाणी तीच्या बाजूला बसलेल्या मुलीला सांगितली.
'दिसायला चांगला आहे, मी आपल्या ह्या स्टॉपच्या आजूबाजूला त्याला बऱ्याचं वेळा पाहिलेय !'
'असेल, मला कुठे त्याच्याशी मैत्री ठेवायचीय; त्याने मदत केली म्हणून माझे राहिलेले कर्तव्य मी आज पार पाडले' रेवा थोड्याश्या फणकाऱ्यानेच बोलली.
'बघ हो बाई, प्रेमा बीमात पडशील त्याच्या'
'असले धंदे करायला मी मोकळी नाही ग !' रेवा बोलली पण आपल्या त्या बोलण्याचा नेमका अर्थ काय हेच तिला कळेना...
रात्री कामे आटपून ती बाल्कनीत येऊन समोर ठेवलेल्या खुर्चीवर जरा विसावली... आकाशाकडे नजर लावून ती येणाऱ्या समस्यांच्या विचारात गुंतली असतानाच मनाच्या एका कोपऱ्यात एक घंटी किणकिणल्याचा आवाज आला....
अचानक तो युवक तीच्या नजरेसमोर आला. अरे तुरे करायचा हक्क न देताही त्याने सरळ रेवाला एकेरी संबोधले होते. त्यातच सरळपणे बोलणे त्याला माहीतही नसावे. अचानक तिने घातलेला गोंधळ तिला आठवला. त्याने डोळे विस्फारून पाहतं असलेल्या त्या मुलींबद्दल बोलतांच आपण कसे पटकन वळून पाहिले हे आठवताच तिला खुदकन हसू आले....
"का हसतेस गं पोरी ?" आईच्या आवाजाने ती भानावर आली. "काही नाही गं, असेच !"
"....काय हे नशीब घेऊन आलीस रेवा, ज्या वयांत संसाराची स्वप्ने रंगवायची, त्या वयांत तुला असे मरेतोवर काम करताना पाहून माझे काळीज तुटते गं"
"बघ परत सुरू केलेस तू तेच पालूपद , अगं आई मी काय उपकार करतेय का तुझ्यावर व पिंटूवर?"
आईचा अगतिक चेहरा तिच्याने बघवत नव्हता. कशीबशी आईची समजूत घालून ती बिछान्यात पडली....
परत त्याच घंटीचा सुर तिला ऐकू आला -
कूस बदलली तेंव्हा खाली झोपलेल्या आई व पिंटूचा चेहरा तिला चंद्र प्रकाशात दिसला व त्या घंटीचे सुर आपोआपच विरळ झाले.
क्रमशः........