पशूदफनभूमी-१

भर रणरणत्या दुपारी धुरळा उडवत गाडीने ब्रेक्स लावले आणि काहीश्या वैतागलेल्या अवस्थेतच सुहास, सीमा, पिंकी आणि छोटा चिनू आपल्या 'नवीन' घरासमोर थांबले. पिंकीचा लाडका बोका मनू मात्र त्या गोंधळातही शांतपणे तिच्या मांडीवर झोपला होता. 


खरं तर घर बदलणं सुहास आणि सीमाला  अजिबात मान्य नव्हतं. पण शहरातली वाढती महागाई, प्रदूषण आणि पिंकी चिनूबद्दल वाटणारी असुरक्षितता यातून त्यांनी हा निर्णय घेतला होता. शिवाय इतकं मोठं आणि चांगल्या अवस्थेतलं घर कमी किमतीत मिळणे ही सुवर्णसंधीच होती. सुहासला दवाखान्यात जाण्यासाठी रोज १० किमी कार चालवावी लागणार होती आणि पिंकीला शाळेची बस चुकवून चालणार नव्हतं इतकेच काय ते तोटे.  


घराला कुलूप होतं आणि किल्ली जुन्या घरमालकाने समोरच्या घरात ठेवली होती. म्हणून सुहासने दारावरची घंटी वाजवली. दार एका साधारण ६०-६५ वर्षाच्या गृहस्थाने उघडले. त्याला पाहताक्षणीच सुहासला तो खूप प्रेमळ आणि मनमिळाऊ वाटला.


गजाननरावांनी सर्वांना आत बोलावले. पिंकीला चॉकलेट आणि चिनूला खेळायला स्वतःचा चष्मा देऊन त्यांची किरकिर थांबवली. सुहास आणि सीमाला पण गार पाणी वगैरे दिले. मनू सोफ्यावर चढू पाहत होता, त्याला हलकीशी चापटी दिली आणि त्याच्यापुढे दुधाची बशी ठेवली. गजाननरावांच्या पत्नीला संधिवाताचा त्रास होता त्यामुळे ती बसूनच होती. गजाननराव सर्व कामं वयाला लाजवणाऱ्या चपळतेने करत होते.


'बाबा, ते बघा काय!' पिंकी खिडकीतून पाहत ओरडली. बाहेर काही अंतरावर एक मैदान होते आणि तिथे रांगेत पांढरे दगड दिसत होते.
'बेटा, ती इथल्या प्राण्यांची दफनभूमी आहे. आपण उद्या सकाळी तिथे फिरायला जाऊ हं!' गजाननराव म्हणाले. 'इथे येणाऱ्या प्रत्येक लहान मुलाला त्या जागेबद्दल खूप कुतूहल असतं. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इथे रहायला आल्यावर या हायवेवर भरधाव ट्रक्सखाली कधीकधी त्यांचे पाळीव प्राणी पण मरतात. इथे राहणाऱ्या मुलांना त्या जागेबद्दल प्रेम आहे कारण बऱ्याच जणांची लाडके प्राणी तिथे आहेत.'


घरी आल्यावर सीमा म्हणाली, 'शी! आल्या आल्या मुलीला काय दाखवणार तर म्हणे दफनभूमी. बघा तो म्हातारा गोड गोड बोलून एक दिवस बायकोचा इलाज फुकटात करुन घेईल.'
'तू प्रत्येकाबद्दल वाईट विचारच का करतेस गं? मला तर तो बरा वाटला. त्याच्या वागण्याबोलण्यातून अगदी अप्पांची आठवण आली.'
'पिंकी अजून लहान आहे. तिला असं काही अभद्र दाखवायलाच हवं का?'
'अभद्र कसलं आलंय त्यात? जन्माला येणार प्रत्येकजण कधीतरी मरणार हे तिला कधीतरी कळणारच ना?आणि म्हणू नये, पण उद्या तिचा लाडका मनू ट्रकखाली आला तर तिच्या मनाची तयारी नको?'
'तू आणि अभद्र बोल. मरणाचा विषय आता इथे आल्याआल्या मुलांच्या डोक्यात आणायलाच पाहिजे का?'


सकाळी सकाळी सुहास सीमा पिंकी आणि चिनू गजाननरावांबरोबर निघाले. पिंकी मजेत होती. दगडांवरची अक्षरे वाचत होती. चिनू पण कधी नव्हे तो सीमाच्या कडेवर शांत बसला होता आणि इकडेतिकडे टुकूटुकू बघत होता.
'आजोबा, तिथे पलीकडे काय आहे?'
'पिंकी, आता ऊन्हं चढायला लागली आहेत. चल बरं. तिथे आपण परत कधीतरी जाऊ. पण तू एकटी जायचं नाहीस हं!'


सोमवार सकाळ. सुहास घरातून लवकर निघून वेळेवर दवाखान्यात पोहचला. बसून पाणी पितो न पितो तोच तीन चार तरुण मुलं धावत आत आली.
'डॉक्टर, आमच्या मित्राला जॉगिंग करताना ट्रकने उडवलं. खूप रक्त वाहतंय.'
सुहासने त्याला पहिलं. जॉगिंगचा टीशर्ट आणि काळी हाफ पँट असाच त्याला आणलं होतं. तो पूर्ण रक्ताने भरला होता. 'हा नाही जगणार.' सुहासला पाहताक्षणीच वाटलं.
'नर्स, अँब्युलन्सला फोन करा लवकर. याला शहरातल्या हॉस्पिटलात नेता आलं तर वाचेल. आपल्याकडे जास्त ऑपरेशनची साधनं नाहीत.'  
'सर, फोन केला होता. अँब्युलन्स नाही. दुसरी खाजगी मिळेल पण त्याचे चार्जेस जास्त आहेत.'
'चार्जेस चं मी बघतो. तुम्ही अँब्युलन्स बोलवा. आणि तुम्ही सगळे, याला आतल्या खोलीत न्या आणि बाहेरच थांबा.'


सुहासने हातमोजे घातले आणि तो त्या तरुणाला तपासायला मागे वळला. तरुण अगदी निपचित पडला होता. 'गेला की काय इथेच' सुहास विचार करत होता. तितक्यात..


तरुणाने सुहासचा हात धरला आणि डोळे उघडले. सुहास दचकलाच. 'सुहास, तुला माहिती आहे.. ती प्राण्यांची दफनभूमी..ती नुसती प्राण्यांची दफनभूमी नाहीच मुळी!!' आणि तो खुदकन हसला. दुसऱ्या क्षणी त्याने आचका दिला.


'याला माझं नाव कसं कळलं?तो दफनभूमीबद्दल काय बडबडत होता? तो तसं खरंच बोलला की तो काहीतरी बरळला आणि मी माझ्या मनातले शब्द ऐकले?' सुहास विचारात पडला.
(भाग २ लवकरच येत आहे. एका गाजलेल्या कथेचा हा भरकटलेला(स्वैर!) अनुवाद आहे. या कथेवर चित्रपटही निघाला आहे.)