पशूदफनभूमी-अंत

'चिनू तू आम्हाला परत हवायस. कोणत्याही अवस्थेत परत आलास तरी आम्ही तुला प्रेमाने आपलं म्हणू....मला जग काय म्हणेल याची पर्वा नाही..


किर्र अंधार होता. सुहास खांद्यावर पोते घेऊन चालत होता. चढापाशी आल्यावर तो क्षणभर थबकला. त्याला गजाननरावांचे शब्द आठवले 'ती जमिन परत बोलावल्याशिवाय राहत नाही..' सुहासला वाटलं, 'कदाचित आपण चूक करतोय. चिनू परत आला तरी तो पूर्वीसारखा नसेल.' पण त्याच्या मनाने परत ग्वाही दिली, 'चिनू कसाही परत आला तरी तो आम्हाला आवडेल. चिनूच्या मृत्यूला मी जबाबदार होतो आणि सीमाला तिचा चिनू परतही मीच मिळवून देईन.' 


निर्धाराने तो चढ चढायला लागला. इतर वेळी त्याचं त्यालाच खरं वाटलं नसतं की तो कुदळ, फावडं आणि पाठीवर चिनूला घेऊन तो चढ चढू शकला. पण इच्छाशक्ती चमत्कार घडवून आणते म्हणतात ते खरे असावे. चिनूला त्या जमीनीत पुरुन तो घरी आला आणि थकून तसाच कपडेही न बदलता झोपून गेला.


पिंकी झोपेतून किंचाळून जागी झाली. सीमाने तिला जवळ घेत विचारले, 'काय झालं?' पिंकी म्हणाली, 'आई मी खूप विचित्र स्वप्न पाहिलं. एक रक्ताने माखलेला माणूस मला सांगत होता की तो विकास भालेराव आहे आणि तो दुसऱ्या जगातून आला आहे. बाबांना धोका आहे. '
सीमाला 'विकास भालेराव' नाव ऐकून अचानक आठवलं. तोच हॉस्पिटलात मेलेला तरुण.. सीमाच्या हृद्यात धडधडायला लागलं.
'आई, आपण घरी जाऊया. मला बाबांकडे जायचं..'


तितक्यात फोन वाजला. सीमाने घेतला. 'कोण सीमाच बोलतेय ना? मी तुमच्या शेजारचा गजानन बोलतोय. तू शक्य झाल्यास लवकर घरी निघून ये. सुहासच्या डोक्यात काही भलतेसलते विचार आहेत आणि तो काहीतरी विपरित करणार आहे असं मला वाटतंय.'
सीमा हादरली. 'पण काका, काय झालं? काय विपरित?पिंकीला पण काहीतरी वाईट स्वप्न पडलं.'
'मी आता फोनवर सांगत नाही. तू घरी ये. आणि घरी जाण्याआधी थोडावेळ माझ्या घरी येऊन जा. मला बोलायचंय.'
सुटीचे दिवस असल्याने गाड्या खच्चून भरल्या होत्या. सीमा म्हणाली, 'पिंकी तू काही दिवस इथेच रहा. आता या गर्दीत आपण दोघी म्हणजे खूप हाल होतील. मी २-३ दिवसांनी बाबांना घ्यायला पाठवीन.'


गजाननराव स्वयंपाकघरात भांडी घासत होते. मागे काहीतरी आवाज झाल्यासारखा वाटला म्हणून ते मागे वळले तर..
चिनू त्यांच्यापुढे उभा होता. डोक्याला झालेली जखम तशीच होती. कपडे मळलेले. पण त्यांना आश्चर्य नाही वाटलं. मनात कुठेतरी हे असं होणार ही पाल चुकचुकत होतीच. पण त्यांना आश्चर्य वाटलं ते चिनूच्या डोळ्यातले भाव पाहून. पूर्वीचा गोड गोंडस चिनू कुठेच नव्हता. त्याने तोंड उघडलं, 'काय रे म्हाताऱ्या, मला परत बोलावलंस ना? दुसऱ्या जगातून आम्हाला या सीमारेषेवर तुम्ही माणसं खेचून आणता. आता मी तुला ती सीमारेषा पार करवतो.'
गजाननराव किंचाळले. पळणार तरी कुठे? दारात चिनू उभा होता. चिनूने बाजूच्या टेबलावर पडलेली सुरी घेतली आणि तो गजाननरावांच्या अगदी जवळ आला..


सीमा मजल दरमजल करत घरापाशी पोहचली. तिने बॅग खाली ठेवली आणि बेल वाजवणार तोच तिला गजाननरावांची सूचना आठवली आणि ती आधी गजाननरावांच्या घराकडे वळली. आत शांतता होती. फक्त स्वयंपाकघरातून लहान मुलाच्या गाण्याचा आवाज येत होता. सीमा तिकडे वळली आणि समोर चिनूला पाहून दचकली. हे स्वप्न का? तिला कळेचना. चिनूच्या हातात काहीतरी होतं आणी तो तिला बोलावत होता..'आई, इकडे ये.' सीमा धावत धावत त्याच्याजवळ गेली आणि त्याला कुशीत घेतलं. शुद्ध हरपताना तिच्या डोक्यात एकच पुसटसा प्रश्न होता.. 'चिनू तर गेला होता ना? तो परत कसा आला? आणि तो आपल्याला कशाने मारतोय?' पण ती शांतपणे चिनूला कुशीत घेऊन खाली पडली.  


सुहास झोपेतून उठला. अंग ठणकतच होतं. जाग आली आणि त्याला कालच्या घटनांचं भान आलं. तो ताडकन उठला आणि त्याने घराचं दार उघडून बाहेर पाहिलं. बाहेर फक्त एक बॅग पडून होती. 'अरे, ही तर सीमाची बॅग.. सीमा आणि पिंकी घरी आल्या? आणि आता कुठे गेल्या?' शेजारी गजाननरावांच्या घरात लाइट होता. तो रस्ता ओलांडून घरात शिरला.


'गजाननराव..' त्याने हाक मारली आणि तो आत गेला तर दारात त्याच्या समोर चिनू हसत उभा होता आणि त्याच्या हातात रक्ताने माखलेला सुरा होता. 'काय केलंस तू?' सुहास ओरडला आणि चिनूला ढकलून आत शिरला.. आत गजाननराव अस्ताव्यस्त अवस्थेत पडले होते. त्यांच्या मानेभोवती रक्ताचा मोठा ओघळ होता.. शेजारी सीमा पडली होती. तिच्या चेहऱ्यावर आणि शरिरावर सुऱ्याच्या असंख्य जखमा होत्या.  


सुहास सुन्न झाला.. त्याला विकासच्या भूताचे शब्द आठवत होते. 'ही सीमारेषा कधीच पार करु नकोस.' पण आता स्वस्थ बसून चालणार नव्हतं.. सीमारेषा त्याने ओलांडली होती आणि वेगळ्या जगातलं काहीतरी बोलावून आणलं होतं.. ते आता परतही त्यालाच पाठवायचं होतं.


सुहासने चिनूच्या हातातून सुरी हिसकावून घेतली आणि त्याला घट्ट धरलं. चिनू रडायला लागला. सुहासच्या पोटात कालवलं.. तोच लहानगा चिनू.. त्याचा लाडका चिनू.. त्याला आपल्या हाताने मारायचं? चिनू त्याच्याकडे निरागस नजरेने पाहत होता. तितक्यात सुहासचं सीमाच्या आणि गजाननरावांच्या देहांकडे लक्ष गेलं आणि त्याने मन घट्ट करुन चिनूच्या मानेवर सुरी चालवली..एकदा..दोनदा. अनेकदा.. आणि तो खाली पडून रडायला लागला.


पोलीस तपासणी झाली.  गजाननराव आणि चिनूच्या प्रेतांवर सुरीच्या जखमा मिळाल्या. सुहासची उलटतपासणी घेतली. त्याने 'हे चोरांचं किंवा घरफोड्यांचं काम असावं'  असा अंदाज व्यक्त केला. सुहासवर पोलीसांना संशय नव्हता.


त्या रात्री सुहासचा मित्र निखील बऱ्याच दिवसांनी त्याला भेटायला आला. बघतो तर सुहास पोत्यात काहीतरी घेऊन कुठेतरी चालला होता. 'कुठे निघालास? आणि पोत्यात काय आहे?'  
'चल माझ्याबरोबर. तुला एक जागा दाखवतो..'
निखिल सुहासच्या मागून चालू लागला. मध्ये प्राण्यांची दफनभूमी पाहून तो चरकला. सुहास पोतं खांद्यावर घेऊन एका चढापाशी थांबला. आणि म्हणाला, 'हा चढ चढून माझ्या मागोमाग ये. ती जागा चढापलीकडे आहे. चढताना विचित्र आवाज आले तर घाबरु नकोस. ते तरसांचे आवाज असतात.'
('ती जमीन परत बोलावल्याशिवाय राहत नाही.' सुहास मनातल्या मनात हसत होता.)
'हे काहीतरी वेगळंच दिसतंय' निखीलच्या अंतर्मनाने त्याला इशारा दिला. आणि निखील मागे वळूनही न पाहता धूम पळत सुटला. तो आयुष्यात परत कधीही त्या गावात आला नाही.


त्या रात्री परत आल्यावर सुहास खूप दमला होता. पण तो झोपला नाही.दार उघडं ठेवून टेबलावर पत्ते खेळत बसला.
मध्यरात्री एका रक्ताळलेल्या हाताने दार उघडले.
सुहासने वर पाहिले नाही.
'मी आले...' सीमा म्हणाली!   


(मूळ कथाः स्टिफन किंगः पेट सिमेट्री, चित्रपटः पेट सिमेट्री.)