चिनूचा लहानसा बूट फक्त रक्ताने माखून बेवारशासारखा सुहासच्या पुढे पडला होता..
चिनूचा देह कापडात गुंडाळून ठेवला होता. सीमाची आई वडील बातमी ऐकून लगेच विमानाने आले होते. सीमाला अजूनही काही कळत नव्हतं. 'चिनू असा का झोपला आहे? सगळे का आले आहेत?'
'सीमा, तू जाऊन जरा विश्रांती घे बरं. चिनू आता कधीच येणार नाही.पण आपल्याला पिंकीकडे बघून तरी सावरायला हवं.'
सीमाला एकदम सर्व आठवलं.. ट्रकचा आवाज, चिनूची किंकाळी..ती किंचाळली 'तूच मरु दिलंस आपल्या चिनूला! तू त्याच्याकडे लक्ष ठेवलं असतंस तर असं झालंच नसतं!'
गजाननरावांनी सीमाला समजावलं. ती रडत रडत ग्लानीत झोपली.
गजाननराव सुहासला म्हणाले, 'सीमाला कुठेतरी पाठव. ती हे सर्व नाही बघू शकणार.कुठेतरी गेली तर तिच्या डोक्यातून हे विचार हळूहळू का होईना, जातील.'
सुहासने सीमाच्या आई वडिलांना विनंती केली की त्यांनी तिला आणि पिंकीला चारपाच दिवस घेऊन जावे. अंत्यविधी वगैरे तो आणि गजाननराव सांभाळतील. सीमाचे आई वडील तयार झाले आणि सकाळच्या विमानाने ते सीमा आणि पिंकीला घेऊन गेले.
'मृतदेह बालकाचा असल्याने त्याचे दहन करता येणार नाही.त्याला मंत्र म्हणून कापडात गुंडाळून पुरावे लागेल.'
सुहासच्या कानापर्यंत शब्द जात होते पण डोक्यात शिरत नव्हते. 'पुरावे लागेल? चिनूला? काल तर चांगला खेळत होता.'
गजाननराव नसते तर त्याच्याच्याने ते सर्व संस्कार होणे अशक्य होते.
'सुहास, तू काही दिवस माझ्या घरी चल. माझी बायको पण घरी नाही. ती तिच्या भाचीच्या घरी गेली आहे. '
सुहास चिनूचा बूट हातात घेऊन बसला होता.
'माझा चिनू मला परत पाहिजे!'
'सुहास, असं करु नये वेड्यासारखं. गेलेलं माणूस कधी परत येतं का?' गजाननराव समजावत होते.
('गेलेलं मांजर परत येतं मग माणूस का नाही?' सुहासच्या डोक्यात वेगळंच विचारचक्र चालू होतं.)
'सुहास, तुझ्या डोक्यात त्या दफनभूमीबद्दल काही वेडेवाकडे विचार तर नाहीत ना? असतील तर ते काढून टाक. माझं ऐक. माझ्याबरोबर चल.'
('माझ्या मनात तेच विचार आहेत. पण मी तुम्हाला सांगणार नाही. गुपचूप सर्व करेन.')
'नाही काका, मी तसं काही करणार नाही. आता मी जरा विश्रांती घेतो. तुम्ही पण विश्रांती घ्या.'
नाईलाजाने गजाननराव उठले. त्यांच्या डोळ्यात शंका होती.
'बघ, मला तरी वाटतं तू आज एकट्याने राहू नयेस.'
'मी व्यवस्थित राहिन. तुम्ही काळजी करु नका.'
रात्र झाली. पाऊस कोसळत होता. सुहास उठला आणि चिनूला पुरलेल्या जागेकडे कुदळ फावडे घेऊन चालू लागला. जमिन भुसभुशित होती. सुहासने जमिन उकरुन चिनूला बाहेर काढले आणि खांद्यावरच्या पोत्यात अलगद ठेवले आणि तो प्राण्यांच्या दफनभूमीकडॅ चालू लागला..
'चिनू तू आम्हाला परत हवायस. कोणत्याही अवस्थेत परत आलास तरी आम्ही तुला प्रेमाने आपलं म्हणू....मला जग काय म्हणेल याची पर्वा नाही...'