'याला माझं नाव कसं कळलं?तो दफनभूमीबद्दल काय बडबडत होता? तो तसं खरंच बोलला की तो काहीतरी बरळला आणि मी माझ्या मनातले शब्द ऐकले?' सुहास विचारात पडला.
संध्याकाळी सुहास घरी आला तेव्हा तो खूप थकला होता. शरीरापेक्षाही मनाने जास्त. त्याच्या डोळ्यासमोर तो उमदा तरुण -(विकास भालेराव नाव होतं त्याचं असं त्याच्या प्रेयसीने सांगितलं.) मेला. त्याचं शव पंचनाम्यासाठी शहरात रवाना झालं.रजेनंतरच्या पहिल्याच दिवशी पूर्ण दिवस या भयाण सोपस्कारात गेला. सीमाशी बोलून जरा हलकं वाटलं. पिंकी चिनूशी खेळता खेळता झोपायची वेळ झालीच.
सुहास गाढ झोपला होता. अचानक त्याला दचकून जाग आली. समोर पाहतो तो समोर सकाळीच मेलेला विकास भालेराव! अंगावर तेच रक्ताळलेले कपडे. 'हॅ! हे स्वप्न आहे.' सुहासने स्वतःलाच बजावले आणि तो स्वप्नात पुढे काय होतं त्याची वाट पाहू लागला. विकास त्याला खुणावत होता आणि तो खोलीच्या दारातून आरपार जाऊन जिना उतरु लागला. सुहास त्याच्या मागेमागे जात होता. विकास प्राण्याच्या दफनभूमीकडे जात होता. 'हे स्वप्न असलं तर आश्चर्यकारकरीत्या खूपच खरं वाटतं आहे. पायांना खडे आणि काटे पण टोचतायत.' सुहासच्या मनात एकीकडे विचार चालू होते आणि तो मंत्रावल्याप्रमाणे विकासच्या मागून चालत होता.
विकासचं भूत प्राण्यांची दफनभूमी ओलांडून चढापाशी थांबलं. आणि पहिल्यांदाच त्याने तोंड उघडलं. त्याचा आवाज खोल गुहेतून आल्यासारखा वाटत होता.
'ही तुझ्यासाठी लक्ष्मणरेषा आहे. ही माणसाने कधीच ओलांडता कामा नये. तू आणि तुझं कुटुंब आता विनाशाच्या दारात उभे आहात. लक्षात ठेव, ही रेषा कधीच ओलांडू नकोस.'
सुहास जागा झाला. त्याच्या कपाळावर घाम साचला होता. स्वयंपाकघरातून सीमाचा आणि पिंकीचा आवाज येत होता. 'हुश्श! ते स्वप्न होतं..' मनाशी म्हणत सुहास उठणार तोच..
त्याचं पायाकडे लक्ष गेलं. पायांना माती आणि जंगलातलं गवत चिकटलं होतं. आणि चादरीवर पण डाग होते. सुहासच्या डोळ्यापुढे खोली गर्रकन फिरली. पण सीमा आणि मुलांसाठी डोक्यातून सर्व विचार झटकून टाकत त्याने चादर पटकन वॉशिंग मशिनमधे कोंबली आणि तो अंघोळ करुनच स्वयंपाकघरात गेला.
दुसऱ्या दिवशी सीमा चिनूपिंकीला घेऊन माहेरी गेली. सुहासचं सासूसासऱ्यांशी कमी पटायचं आणि ते 'जावयाला आपल्या श्रीमंतीचा रुबाब दाखवून हिणवतात' असं सुहासचं खाजगीतलं मत होतं. त्यामुळे तो घरीच राहिला.
'बाबा, मनूची काळजी घ्या. त्याला वेळेवर दूध द्या. त्याला सांगा मी ३ दिवसात येईन.' पिंकी मनूला कुरवाळत सांगत होती.
'हो, तुम्ही काळजी करु नका. आणि सीमा, पोहचल्यावर फोन कर.नीट जा.'
फोन खणखणला. 'सीमाचा पोहचल्याचा फोन असेल' म्हणून सुहासने उचलला. 'सुहास, मी गजानन बोलतोय.' माझ्या घरासमोर एक मांजर मरुन पडलंय. रंगावरुन तरी तो पिंकीचा मनू वाटतो आहे.तू येऊन बघ.'
तो मनूच होता. 'पिंकिला कळलं तर ती रडून रडून आकाशपाताळ एक करेल. तिचा खूप आवडता होता तो.'
गजाननरावांचे डोळे चमकत होते, की प्रकाशामुळे तसं वाटत होतं, कोण जाणे! पण ते वेगळेच वाटत होते.
'सुहास, या म्हाताऱ्याचं ऐक. अशा परिस्थितीत तुझं कर्तव्य आहे आणि ते तुला करावं लागेल.'
मनूला पोत्यात घालून प्राण्यांच्या दफनभूमीत नेलं. आता सुहास जागा शोधणार तोच.. गजाननरावांच्या मनात काही वेगळंच होतं. 'इथे नाही, त्याला मी सांगतो तिथे पुर. तो चढ चढून पलीकडे जा.'
'तुम्ही नाही येणार?'
'नाही, हे काम ज्याचा प्राणी असतो त्याला एकट्यालाच करावं लागतं. तू चढ चढून वर जा. चढताना तुला आवाज आले तरी लक्ष देऊ नकोस. ते जंगलातल्या तरसांचे आवाज असतात. त्याला पुरुन परत ये.' गजाननराव काही वेगळंच बोलत होते आणि त्यांचे डोळे खूप अनोळखी वाटत होते.
नंतरचा एक तास सुहासला एका दिवसासारखा वाटला. ते विचित्र आवाज.. तो कंटाळवाणा चढ, काटेकुटे, पाठीवर पिंकीच्या लाडक्या मनूचं प्रेत,ते खणून खणून खांद्यात आलेले गोळे.. पण कुठल्यातरी मनःशक्तीने असेल बहुधा, तो एकटा बोक्याला पुरून परत आला आणि दमून गाढ झोपून गेला.
सकाळी सुहास उठला तेव्हाही त्याचं अंग ठणकत होतं. ब्रश घेऊन तो बाथरुममध्ये गेला आणि.....
पिंकीचा लाडका मनू चकाकत्या डोळ्याने पाहत बेसिनवर बसला होता!!!