ह्यासोबत
"मृणा, जाऽऽऽ नाऽऽ गं.. पाणी घेऊन ये आपल्याला प्यायला आजीकडून.."
"प्रिता, डोक्याला मुंग्या आणू नकोस माझ्या सारखी भुणभुण लावून. मी जाणार नाहीये त्या वाघाच्या गुहेत कुठल्याही कारणाने, अँड दॅट्स फायनल.. ओव्हर अँड आऊट.."
"तोंड पहा म्हणे ओव्हर अँड आऊट.." तोंड वाकडं करत करत प्रिताश्रीने मृणालचे शब्द उच्चारले. "इतका काही तोरा दाखवायला नको. मीच जाते आणि घेऊन येते पाणी." असं म्हणून प्रिताश्री जायला लागली तर लगेच रस्त्यात आडवी येत मृणाल म्हणाली,"तू जाऊ नकोस तिकडे. तो आजोबा खूप टेरर माणूस आहे बरं का? अस्सलं जब्बरी बोलतो ना की धडकीच भरते. तूही नको जाऊस, आपण शेजारच्या हॉटेलात जाऊन घेऊन येऊ ना पाणी.."
"कदापि नाही. त्या भंगार हॉटेलमधून आणलेलं पाणी मी अजिबात प्यायची नाही. तुला हवं तर तू बैस ते पाणी पित. मी आजीकडूनच आणणार आहे पाणी." असं म्हणून प्रिताश्री निघालीही !
"पण तू का जातेस? मी जाते ना.." असं म्हणत मृणाल प्रिताकडून बाटल्या काढून घ्यायला लागली.
"आता का? आता का? मगाशी तर मारे ओव्हर अँड आऊट केलेलंस की.. जायचं तर तुलाच असतं त्यांच्या घरी मग नसते नखरे ते कशाला?"
"हो गं. मलाच जायचं असतं. ती आजी खूप प्रेमळ आहे माहितेय का? ती सद्ध्या मण्यांचं वृंदावन बनवते आहे. तिची त्याबद्दलची कल्पना ऐकूनच तुला सांगते एकदम सॉल्लीड होणार आहे ते. मला शिकायचं आहे. पण त्याही अगोदर ना मला मण्यांचा गणपती शिकायचा आहे गं. इतका सुंदर आहे सांगू ! पण ते आजोबा आहेत ना त्यांचा आवाज खूप धडकी भरवतो बाई.. मी कित्तीवेळा ठरवलं की घाबरायचं नाही म्हणून पण घाबरतेच ! परवा ना.."
"ए बये, टकळी बंद करून जरा पाणी आणायचं बघशील का?"
प्रिताच्या या वाक्यावर तोंड वाकडं करून मृणाल बाटल्या घेऊन आजींच्या घराकडे निघाली.
"कोणी आहे का घरात?" 'जलतुजलालतू.. आई बला को टाल तू..' असं काहीसं पुटपुटत मृणाल दरवाजात उभी होती. तिची घाबरीघुबरी नजर कुठे 'वाघ' दिसतोय का बघत चौफेर दौडत होती, तेवढ्यात "कोणेऽऽ" असं म्हणत आजी माजघरातून बाहेर आली.
"अग्गोबाऽऽई, मृणू तू होय.. बाळ तिथे दारात का गं तू उभी. ये की घरात."
"आजोबा आहेत का घरात?" चोरपावलांनी घरात शिरत खुसपुसत्या आवाजात मृणालने विचारलं.
"नाही. विश्वासचे वडील नाही आहेत घरात. काही काम होतं का त्यांच्याकडे तुझं?"
'वाघ' घरात नाही कळताच मृणालने सुटकेचा निश्वास टाकला आणि मोकळेपणाने घरात वावरत नेहमीची बडबड सुरू केली. बाटल्या भरून द्यायला आजी स्वयंपाकखोलीत जाताच तिच्या मागेमागे तिथे जात त्यांच्या गप्पा चालूच होत्या. "तू ते गणपतीचं वॉलहँगिग बनवलं आहेस, ते मला शिकवशील का गं? मला भारी आवडलंय ते. आणि तुझं ते वृंदावन कुठवर आलं आहे?"
"अगं बरी आठवण केलीस.. त्यात काहीतरी चुकत आहेसं वाटतंय मला. तू बघतेस का? माझे विचार एकसुरी झालेत असं वाटत आहे. तू नविन नजरेनी बघशील तर तुला कदाचित काही सुचेल.."
तास - दीड तास दोघीजणी मण्यांच्या राज्यात गढून गेल्या होत्या. मध्येच तणतणत प्रिताश्री येऊन थोडावेळ तिच्यासाठी अगम्य आणि कंटाळवाणा असा या दोघींचा उद्योग बघून बाटल्या घेऊन निघून गेली होती. ही गोष्ट आजीने नमूद केली असली तरी मृणालच्या ती गावीही नव्हती. ती पूर्णतया तिच्या 'वृंदावना'त रममाण झाली होती !
"याऽऽऽऽऽऽहूऽऽऽऽ.. ए आजेऽऽऽ जमलं गं.. बघ.. कस्सलं खास दिसतंय बघ ना.. लवक्कर बाहेर ये.. " असं ओरडत मृणाल वृंदावनाच्या निर्मितीतली आजीची अडचण सोडवू शकलो याचा आनंद काहीतरी करायला स्वयंपाकघरात गेलेल्या आजीला सांगत होती, तितक्यात..
"काऽऽऽय जमलं गं तुला पोरीऽऽऽ?" असं म्हणत आजोबा आले. त्यांचा जबरदस्त अधिकारवाणीचा आणि दमदार आवाज ऐकून मृणालची गाळण उडाली. चेहऱ्यावरचा आनंदी भाव खर्रकन उतरला. हातापायाला घाम सुटला तिच्या.
"क... क... का.. का.. काही ना.. ही.. आ.. जोबा.."
"ततपप करायला काय झालं? मी काही खाऊन टाकणार नाही आहे तुला."
डरकाळी फोडून सिंहाने "मी खाणार नाही आहे तुला." असं म्हटल्यासारखं वाटलं तिला ! पण वरकरणी,' अं? हो... मी जाते आता.. खू खूप वेळ झाला.. मी जाते आता..." 'येते गं' म्हणायची सवय असूनही आपल्या तोंडून 'जाते' शब्द कसे बाहेर पडले याचं आश्चर्य वाटलं मृणालला..
"अहोऽऽ विश्वासची आई, आम्ही आलो आहोत. "
"हो. आलेच हं.." असं म्हणत आजीने त्यांच्यासाठी पाण्याचा गडवा भरून आणला, तोवर काढता पाय घेत मृणाल सटकण्याच्याच बेतात होती. आजी दिसताच जीवातजीव आल्यासारखा वाटला तिला.. पायात चपला सरकवत तिने, घाईघाईने "ए आजी, मी येतेय गं.." असं म्हणत घराकडे सुंबाल्या केला.
"अगं पण गणपतीऽऽ.." असं आजी म्हणेतोवर ती गेलीही होती !
"का हो ही पोरगी अशी का वागते वेंधळ्यासारखी काही कळत नाही."
मनापासून हसतहसत आजी म्हणाल्या," ती घाबरते तुम्हाला !"
"मला घाबरते? अन् ते काय म्हणून? तुम्ही सांगायचंत ना तिला की मी कसा आहे ते.."
"हजारदा सांगून झालं. हो हो करते पण तुम्ही दिसलात की दातखीळ बसते तिची."
गडगडाटी हास्य करत आजोबा खळखळून हसत होते, आणि तो आवाज ऐकून वरच्या खोलीतली मृणाल आणिकच घाबरत होती !
क्रमशः