मला मी सांगू कसा वाटतो
थेंब थेंब जसा रोज साठतो
शब्दास शब्द, हाकेस हाक, कधी नि:स्तब्ध राहतो
जीवनपूजेचा रोज असा मी प्रसाद वाटतो ॥
टाळीला जेव्हा टाळीही मी देतो
खांद्यालाही खांदा सहज मी जुळवतो,
कमवून मित्र अनेक, कधी एक गमवतो
तेव्हा ओढ्यात बसून डबक्यात पाहतो
मला मी सांगू असा वाटतो .....
कधी कुणी भावनांचा वसंतही देतो
तरी पालवी न फुटता, मी मैत्रीतच खुजतो
कधी डोळ्यात नकार साचतोच फार
तेव्हा बरसूनी, इंद्रधनु दिसल्याचा आव आणतो
मला मी सांगू असा वाटतो .....
रोज स्वप्नांच्या यादीसवे मी निघतो
काही गाठतो,काही खोडतो,काही पुन्हा लिहीतो
तरी सायंकाळी मी उरे इतुका एकटा
की एकांतही मजला एकटा सोडतो