'उन्हाळा' येतो आहे याची दवंडी आमच्या घरात पिटली जायची ती दुचिवावरच्या अर्थसंकल्पाने ! आम्ही येऊ घातलेल्या परीक्षेच्या तयारीत गुंग असताना, दुचिवा जास्त वेळ बघण्याबाबत इतरवेळी आम्हाला ओरडणारे बाबा, तहानभूक बाजूला सारून कागदपेन घेऊन अर्थसंकल्पाची टिपणं काढत जेव्हा आमच्या शेजारी येऊन बसायचे तेव्हा आपल्याला समदुःखी मिळाल्याच्या आनंदाने खूऽप छान वाटायचं. बालवाडी/पहिलीत होते तेव्हा त्यावेळच्या साध्या बॉलपेनांनी काही लिहिल्यास एक आगळाच सुगंध यायचा, जो जास्तीत जास्त घेता यावा म्हणून,"आणखी लिहा बाबा, आणखी लिहा !" असा धोसरा बाबांच्या मागे लावायचे ! पुढे पुढे मात्र ओ की ठो कळत नसलेल्या त्या अर्थसंकल्पाचा खूप राग यायचा पण त्यामुळेच की काय दुचिवाकडे आपोआपच दुर्लक्ष होऊन अभ्यासात मन लागायचं.
एप्रिलमध्ये अपेक्षित असलेल्या स्पर्धापरीक्षा नेहमीच कशा काय प्रिपोर्न (?) होऊन फेब्रुवारीत यायच्या कोण जाणे ! नेहमीच्या परीक्षांपेक्षा त्या परीक्षांचं अप्रूप जास्त असल्याने त्यांच्या अभ्यासात गुंग झाल्याने दुर्लक्षित पडलेली शालेय वह्यापुस्तके झटकली जाऊन परत अभ्यासायला घ्यावी लागायची. डोक्याला काही खाद्य देणाऱ्या स्पर्धापरीक्षांची परीक्षणपद्धती अवलंबण्याऐवजी घोकंपट्टीला महत्त्व देत असलेली ही शालेय परीक्षापद्धती मला कधीच रुचली नव्हती, पण न आवडून सांगते कोणाला? नावडीनेच तरीही मुद्दामहून करायला घेतलेल्या अशा या पाठांतरात माझी लवकर लवकर प्रगती कधीच व्हायची नाही पण परीक्षेची तारीख जवळजवळ येत जायची त्यामुळे होळीला वेगळ्याच अर्थाने अभ्यासाची 'बोंब' उडायची. शाळेत गेलं की दोस्तांना "तुझे किती धडे झाले? लेखककवी पाठ झाले का?" वगैरे प्रश्न विचारणं मग अगदी ठरलेलंच असायचं. होळीची पूजा वगैरे करणे प्रकार कधी केले नसले तरीही ती जळते ते बघायला रात्र जागवणे मात्र हमखास करायचो. होळीनंतर येणाऱ्या रंगपंचमीला एकमेकांना चोपडल्या जाणाऱ्या त्या चित्रविचित्र प्रकारच्या रंगांमुळे ज्यात वॉर्निश वगैरे सारखेही रंग अंतर्भूत असायचे, बघूनच कसंसं व्हायचं अगदी. निख्खळ गुलाल किंवा कुठल्या फुलोत्पादित रंगांनी खेळली जावी अशी रंगपंचमी कधीच पहायला मिळाली नाही त्यामुळे मी कधीच रंगपंचमी खेळले नसले तरीही मी गच्च बंद ठेवलेल्या खोलीच्या खिडकीला कोणाच्या नकळत किलकिलं करून बाहेर रंग खेळणाऱ्या इतरांचा खेळ पाहायला धमाल मजा यायची.
वर्षभर अभ्याससातत्य ठेवायची सवय असल्याने ऐन परीक्षेच्या आधी काही दिवस परीक्षेचा अभ्यास करण्यात माझं मन कधी म्हणून लागलंच नाही. याला अजून एक कारण म्हणजे आमच्या परीक्षांनंतरच्या सुट्ट्यांसाठीची दिलखेचक आकर्षण निर्माण करेलशी तरतूद आईने आधीच करून ठेवलेली असायची. कधी वैज्ञानिकांच्या गोष्टींचं तर कधी गोट्या-चिंगी-फाफे-टारझन-खडकावरला अंकूर अशी पुस्तकं तर कधी कुठला नविन खेळ तर कधी काय असं तिच्या वार्षिक अर्थसंकल्पानुसार ठरलेल्या रकमेत जमेल असं जे काही असेल ते तिने आधीच आणून लपवून ठेवलेलं असायचं. यावेळी कुठली लॉटरी लागणार याची गुप्तहेर खात्याकडून माहिती काढून, ती गोष्ट कुठे लपवली असेल याचा शोध घेण्यासाठी आईच्या लपवालपवीच्या हुकमी जागा धुंडाळणे आणि परीक्षा चालूही होण्याअगोदरच त्यातला चोरटा आनंद मिळवण्याचा अयशस्वी का होईना प्रयत्न करणे हा माझा अगदी आवडता उद्योग होता. या वागण्याबद्दल आईचा ओरडा खातखात अभ्यास करणे आणि गणित-विज्ञानाचा सराव वर्षभरात छान मुरलेला असल्याने त्यात बऱ्यापैकी पटाईत होऊन पण इतिहास-भूगोल-नाशासारख्या पाठांतराभिमुख विषयांबद्दल 'जलतुजलालतु आइ बला को टाल तू'चा जप जपत परीक्षा द्यायला जायचे. यामुळेच की काय गणित-विज्ञानाच्या परीक्षेनंतर मी लिहिलेल्या उत्तरांच्या योग्यायोग्यतेबद्दल अगदी कसून फेरतपासणी करून घ्यायचे दोस्तांशी चर्चा करून, घरीही अगदी उत्साहाने चर्चा करायचे पण इतिहास-भूगोल-नाशाची उत्तरपत्रिका कशीबशी हातावेगळी केली की कोणी हाक मारली तरीही एक नाही नि दोन नाही, मागे वळुनही न बघता सरळ घराची वाट धरायचे !!!
असे बरेवाईट अनुभव येतयेत परीक्षा संपून जायची आणि मग आजवर लपूनछपून चाललेल्या कारवाया उघडउघड करायला अबोलित ( अलिखित असतं तसं अबोलित ! ) परवानगीच मिळायची ! थंडीच्या दिवसांत उशिरापर्यंत झोपायची कारणं शोधणारी मी,"आई, आजपासून झाडांना पाणी मी टाकणार !" असं घोषित करून सकाळी पाचला झाडांना पाणी टाकायला बागेत हजर असायचे ! सगळ्या झाडांना टाकून झाल्यावर शेवटी बादलीत उरलेलं ४-५ मग्गे पाणी थोडं थोडं मग्ग्यात घेऊन वर आकाशाकडे फेकायचे, असे केल्याने निर्माण झालेल्या जलबिंदूंच्या वर्षावात भिजायला जाम आवडायचं. याकरता जास्त पाणी उरावं म्हणून एकदा मी झाडांना कमी पाणी टाकलं होतं. माझा हा खोडसाळपणा आईच्या लक्षात आल्यावर खूप बोलणी पडली होती, हे निराळं !
सकाळच्या स्वयंपाकात आणि नंतर वाढप करण्यात आईची थोडीशी मदत केली न केली की लगेच बाहेर खेळायला पळायचे. रुमालपाणी, विषामृत, पकडापकडी, दगड की माती?, दोरी, लगोरच्या, गोट्या, पतंग इ.इ. खेळ अगदी सकाळी दहालासुद्धा रंगायचे आमचे ! मामाकडे म्हणून आलेली कित्येक दोस्तमंडळी तब्बल वर्षानंतर भेटत असायची ( आईकडचे नातेवाईक असूनही त्यांचं प्रेम काय असतं, आपल्याला त्यांच्या घरी बोलावलं जाणे, हक्काने आपण त्यांच्याकडे काही मागणं वगैरे प्रकरण मला अनुभवायलाच नाही मिळालं, त्यामुळे मी आजोळी जायचं म्हणून कुठे जाण्याचा प्रश्न कधी उद्भवलाच नाही. असो. ), त्यामुळे त्यांना सहजतेने खेळात सामील करून घेऊन धमाल गंमत करायला मजा यायची. जेवणाची भूक कमीच असायची, तरीही आई ओरडायची म्हणून दोन घास कसेबसे पोटात ढकलून परत खेळायला सवंगड्यांमध्ये कधी जातेय असं व्हायचं. खेळात घ्याव्या लागलेल्या या मध्यंतरानंतर ऊन कडाडलं ( या मध्यंतरामुळेच ऊन कडाडतं असा माझा कित्येक दिवस समज होता ! ) असल्याने मैदानी खेळ खेळायला संधी उरायची नाही. भर उन्हात अगदी अनवाणी पायांनीही खेळायची माझी तयारी पूर्ण असायची पण साथसंगत करायला दोस्तांपैकी कोणी तयारच नसायचं. मीही मग 'मेजॉरिटी इज द लॉ'ला मान देत, सावलीमध्ये बसून खेळता येतील असे खेळ खेळायला तयार व्हायचे. कॅऱम, पत्ते वगैरे खेळायचे म्हटलं तर घरात खेळावे लागणार किंवा घराच्या जवळतरी, पण त्याला माझ्या घरातून कडाडून विरोध असायचा कारण आक्काला दुपारी झोपायचं असायचं ! मग कुठल्यातरी झाडाखाली, शेजारच्या काकांच्या रिक्षात किंवा एखाद्या दोस्ताच्या घरातले ओरडेस्तोवर ति/त्याच्या घराजवळ आमच्या खेळाचा अड्डा सजायचा. दरवेळेस नविन काहितरी खेळ खेळायचा ही आमच्यातल्या बऱ्याच जणांचा धोसरा असायचा आणि त्यासाठी कल्पक दोस्तमंडळ पूर्ण सज्ज असायचं. मग कधी भर दुपारी भूताखेतांच्या कथा रंगायच्या तर कधी साबणाच्या पाण्याचे फुगे उडायचे, कधी सुईचा उपयोग करून एकमेकांत न मिसळतील याची दक्षता घेत पाण्याचे छोटे छोटे ड्रॉप्स (?) हातावर माववून दाखवण्यासाठी आटापिटा केला जायचा तर कधी कुठे बांधकामासाठी येऊन पडलेल्या वाळूमध्ये शंखशिंपले गोळा करण्याचा सपाटा चालू व्हायचा. असंच कधी काय तर कधी काय ! या सर्व कुटाण्यांमधून इतर कुठे लक्ष जायला काही फुरसतच नसायची. संध्याकाळी मग ऊन उतरायला लागलं की परत घराची आठवण यायची ती बॅडमिंटनच्या बॅटा आणि फूल घेऊन येण्यासाठी ! मग या नविन स्पर्धेला सुरूवात व्हायची आणि पाऽऽर अंधार होऊन फूल दिसेनासं होईतो चालू रहायचं. अंधार व्हायला लागला की मग शेजारच्या काकूंच्या पडवीत काकवाआज्या,आई वगैरे गप्पा मारत असायचे ( ज्यात आमच्या नावाचाच उदोउदो(!) चाललेला असायचा बऱ्याचदा. ) तिथे जाऊन आम्हां लहानग्यांचंही एक गप्पामंडळ स्थापन करायचो आणि त्यात मग आमच्या जिव्हाळ्याच्या गप्पा ( म्हणजे भांडणं ! ) सुरू व्हायच्या ! आमच्या या गप्पांमुळे मोठ्यांच्या गप्पांना वेगळंच वळण लागायचं आणि सगळं निपटवून आई घरी जायला निघाली की हमरीतुमरीवर आलेल्या मलाही ओढत ओढत घरी घेऊन जायची.
दिवसभराच्या माझ्या गंमती माहिती नाही असा आईइतका छान श्रोता दुसरा तो कोण असणार? असं समजून दिवसभराच्या गंमती तिला सांगायला सुरूवात व्हायची. आईला संध्याकाळच्या स्वयंपाकात व वाढप करण्यात मदत करायची जबाबदारी दादाआक्काकडे असल्याने घरात मी अगदी सम्राज्ञीसारखी जाऊन बसायचे ! ताटपाणी सगळं आपोआप ठेवलं जायचं, वाढलंही जायचं आणि जेवणे फक्त माझ्याकडे बाकी उरायचं. इतकं छान वाटायचं माहितेय दिवसभराच्या इतक्या थकव्यानंतरचं (!) हे आयतं जेवण ! जेवणं झाली की मी असूनही घर शांत असलेलं बघवायचं नाही, म्हणून पत्त्यांसाठी मी दादा-आक्काकडे लकडा लावला की त्यांचं उत्तर ठरलेलं असायचं,"बाबांना विचार ते खेळतायत का ते. ते खेळत असतील तर खेळते/तो." अशी अट घालण्यामागे त्यांना वाटत असलेली बाबांची भिती मलाही वाटत असेल असं गृहित धरून मला कटवण्यासाठी त्यांनी खेळलेला हा पैतरा असे. मी कसली घाबरायला आणि मागे सरायला? बाबांना हरेक प्रयत्न करून आमच्यासोबत खेळण्यासाठी मनवून आणून त्यांचा हा बेत हाणून पाडायचे. एकदा का पत्त्यांचा खेळ सुरू झाला की नंतरची मजा काय वर्णावी ! खेळ खेळताना, तोंडात टाकायला द्राक्षं, टरबूज/खरबुजाच्या फोडी वगैरेपैकी काहीतरी तर असायचंच. गड्डा झब्बूमध्ये बाबा मुद्दाम, अमिताभ बच्चन फाईटींमध्ये घ्यायचा तसं, आधी पडतं घेऊन जवळपास अख्खा कॅटच्या (?) कॅटच हातात बाळगून आहेत की काय असं म्हणायची वेळ आणायचे. बाबा हरणार हरणार, हा विजयोन्माद मी अनुभवायचा प्रयत्न करत असायचे तोवर काही कळायच्या आतच पुढच्या निर्धोक उतारीसाठीचा एक पत्ता हातात ठेवून सगळा गठ्ठा माझ्या हवाली करून पहिल्या विजेतेपदाचा मान मिळवून ते कधी मोकळे व्हायचे कळायचंदेखिल नाही!!! माझं तोंड अगदी बघण्यासारखं झालेलं असायचं तेव्हा. दिवसभराच्या कामामुळे थकलेले बाबा अगदी रागात असले आणि खेळायला यायला नाही म्हणाले तर मग आई तर हुकमी असायचीच आमच्याशी खेळायला, तसंही हाताला थोडीशी थरथर असल्याने बाबा कॅरम खेळायला कधीच आले नाहीत आमच्याशी. कॅरममध्ये दादा-आक्का जोडी जाम खतरनाक, तशी माझी-आईची जोडीही रंगायची कधीकधी पण राणीला संरक्षण देण्यात दादा-आक्काची खासियत अगदी वाखाणण्याजोगी. त्यांना अटीतटीची झुंज द्यायला लावण्यातही जिथे मला कोण आनंद व्हायचा तिथे त्यांच्याविरुद्धचा सामना चुकूनमाकून कधी जिंकला तर मग तर अगदी क्या केहने !
आई जर कधी मूडमध्ये असली तर तिने पाठ करून ठेवलेल्या सुंदर सुंदर गाणी/कविता म्हणून दाखवायची. त्यात मध्येमध्ये येणारं तिचं त्या गाण्यातल्या ओळींवरचं स्पष्टीकरण तर अगदी बिनतोडच.
कितीही दमले असले तरी बाबांशी थोडावेळ का होईना गप्पा मारल्याशिवाय कधी झोपलेय असं झालंच नाही. या माझ्या अलिखित नियमाला तर वेळेचं काही बंधनच उरायचं नाही उन्हाळ्याच्या सुट्टीत. दिवसभराच्या ऑफीसमधल्या कामाने ते थकले असतील हा विचार माझ्या मनात अजिबात यायचा नाही, आईकडे जशी टकळी सुरू व्हायची तशीच अगदी तितक्याच मनमोकळेपणाने ती बाबांकडेही सुरू व्हायची. माझ्या फुटकळ खेळांवरचं त्यांचं हसणं आणि माझ्या कुठल्या गोष्टीतून त्यांना आठवलेली त्यांच्या आयुष्यातला एखादा अनुभव ऐकण्यात, त्यानंतर ते जे काही त्यातून शिकले असं ते सांगायचे तेही ऐकायला खूप छान वाटायचं. त्यांच्या गप्पा, त्यांचे शब्द मनात साठवून ठेवायचा प्रयत्न करत झोपून जायचे.
होताहोता अक्षय्यतृतीया कधी येते याची अगदी आतुरतेने वाट बघायचो, कारण देवाला प्रसाद दाखवून कैऱ्या, आंबे त्याआधीच घरात आले असले, रस खाल्ला गेलेला असला तरी जास्त चवदार आंबा महाग असल्याने की काय एकदाच घरी येण्याचा मुहूर्त म्हणजे अक्षय्यतृतीया. याच दिवशी थोडा महागाचा असला तरी बेहत्तर पण प्रत्येकाला अगदी आकंठ आस्वाद घेता येईल इतका खायला मिळेल असा आंबा घरी यायचा. आई-आक्का रस काढायच्या आणि मी-श्री रस काढल्यावर बाजूला ठेवलेल्या सालीकोयींना चिकटून उरलेला रस चोखून चोखून खाण्यात मग्न व्हायचो ! अशाप्रकारे आधीच तुम्ही रस खाल्ला असल्याने तयार झालेल्या रसातला तुमचा हिस्सा कमी, असं म्हणणाऱ्या दादाआक्काशी अगदी चेकाळून जाऊन भांडण व्हायचं. नंतर जेव्हा आमच्यासमोर आलेल्या वाटीत त्यांच्या वाटीत असलेल्या रसाइतकाच रस दिसायचा तेव्हा भांडणासाठी उघडलेल्या तोंडात रस भरला जायचा !
साधारण परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत हे चालायचं. साधारण तेव्हाच वर्षासाठी गहू घेतले जायचे. ते टप्प्याटप्प्याने रोज सकाळी वर गच्चीत नेऊन पसरवणे व संध्याकाळी गोळा करून बाजूला ठेवणे, हे काम सुरू व्हायचं. गव्हाला ऊन देऊन झालं की नंतर आई गहू चाळायची आणि आम्ही निवडायला बसायचो. दिवस अखेरीपर्यंत कोणी किती निवडलं याची स्पर्धा असायची, मध्ये गाण्याच्या भेंड्यांची मजा असायची, गप्पाही असायच्याच पण गव्हामध्ये क्वचित मिळणारे हरबरे शोधण्यात तर या सर्वाहून जास्त मजा यायची. गहू चाळून देत असल्याने हरबरे मिळण्याची दाट शक्यता आईकडेच जास्त असायची, तिला ते सुके हरबरे खाण्यात काहीच गम्य नसल्याने ती तिला मिळालेला एखादा सुका हरबरा कोणाला देते आणि का देते हे समजून घेण्यात खूप उत्सुकता असायची. "तू आक्काला का दिलास? आधीचा हरबरा तू तिलाच दिला होतास मग आता परत तिलाच का दिलास?" अशा फुटकळ कारणांवरूनही मी किती चिडलेय, रडलेय, फुरंगटलेय आईवर ! ( आता खूप हसू येतं त्याबद्दल स्वतःचंच. )
बटाट्याचे पापड - आईला अपेक्षित पात्तळ लाटायला शिकायला खूप वेळ लागला होता, साबुदाणा-बटाट्याच्या कुर्डया, साबुदाणा-बटाट्याच्या चकल्या, लोणची वगैरे तर असायचेच पण तिखट म्हणजे मिरचीपूड, हळकुंडापासून हळद, रिठ्यापासून शिकेकाईसुद्धा घरीच करायचो आम्ही. लाल मिरच्या विकत आणून त्या निवडणे व नंतर ग्राईंडरमधून (?) घरीच दळून काढायचो. पापडकुर्डयांकरता मुद्दामहून हाक मारणारी आई, मी खेळायला बाहेर पळाले की मगच तिखट/हळदी/शिकेकाईचे उपक्रम सुरू करायची. त्यामुळे सुरू करायची त्यादिवशी नंतर ती आणि आक्काच हे दळणाचं काम करत होत्या हे कळल्यावर वाईट वाटायचं आणि दुसऱ्या दिवशीपासून खेळाच्या कार्यक्रमाला स्वतःहून फाटा देऊन या उपक्रमात मुद्दामहून घुसून छोटंमोठं का होईना पण त्यांना उपयोगी पडेल असं कुठलंतरी काम करण्याचा खारीचा वाटा मी उचलत असे. मिरच्या दळत असताना पंखा चालू ठेवता यायचा नाही, त्यामुळे घाम यायचा. असंच एकदा घाम आल्याने तिखटाने माखलेल्या हाताने मी माझा चेहरा पुसला होता.. फुल्टू मजा (!) झाली होती माझी मग !
घरातली उन्हाळी कामं संपायची तोवर दोस्तांची पांगापांग व्हायला सुरूवात झालेली असायची. सुट्टीसाठी आणल्या गेलेल्या खास गोष्टींचा मनमुराद फन्ना उडालेला तर असायचाच, पुस्तकांचीही पारायणं झालेली असायची. "काय करू गं आता मी?" असं माझं आईमागे टुमणं लागायच्या आधीच शेजारी राहणाऱ्या आजींकडे नविनच एखादं लोकरीच्या विणकाम दिसायचं किंवा एखादी काकू मण्यांच्या वेणीचा एक नमुना घेऊन यायच्या. आईमागे या गोष्टींसाठी धोसरा लावून उपयोग नसायचा कारण सुट्टीसाठीचा अर्थसंकल्प संपलेला असायचा. कुबेराकडे मागणी नोंदवायची तर त्यांची मर्जी सांभाळायला हवी, मग त्यांच्या हापिसात त्यांची मदत करायची, सांगतील ते काम करायची. हवी ती गोष्ट काढून घ्यायचीच. भर उन्हाळ्यात लोकरीचं विणकाम करत घामाने निथळावं लागलं तरी नवनिर्मितीचा आनंद मिळवण्यात काय जब्बरी आनंद मिळायचा ! वाह !!
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आऊकडे ( राजा शिवछत्रपती पुस्तक वाचलं तेव्हा त्यातला 'जिजाऊ' शब्द खूप आवडला म्हणून मी त्यातला 'आऊ' हा शब्द माझ्या आजीला हाक मारण्यासाठी उचलला होता. )जाण्याचा कधी मी हट्ट धरला किंवा तिने मला बोलावले तर अगदी नाचतनाचत तिच्याकडे जायची माझी स्वारी. आमची रिक्षा आऊच्या घरासमोर थांबली की सामानातली एखादी छोटी पिशवी घेतली न घेतली करत कशाबशा चपला काढत,"आऽऽऽऽऊऽऽऽ मी आऽऽले !" असा ओरडा करत घरात घुसायचे. "आली का बंडी तू?" असं कौतुकाने म्हणत यायची. माझ्या तोंडावर मायेने हात फिरवून सामान आणायला जायची. आई-आऊ मग स्वयंपाकखोलीत जायच्या आणि तयारी करायला लागायच्या. तिथे मध्येमध्ये लुडबुड करत माझ्या तिथल्या दोस्तांच्या उपस्थितीची चाचपणी करायचे. पोटात भर पडली की "ए किर्ती.." "ए रघू.." असं हाका मारत एकेकाला बोलावण्यात आणि विटीदांडू, सूरपारंब्या, झाडावर चढणे वगैरे खेळ सुरू व्हायचा. मला आऊकडे सोडून आईबाबा परत घरी गेले की तिथल्या रोजच्या वातावरणात जमवून घ्यायचा प्रयत्न करून आजीला मदत (!) करण्याचा प्रयत्न करे. शहरातल्या घरी पाणी २४ तास पण इथे पाण्याचा बराच तुटवडा असायचा. भर्र पाण्याखाली धुणंभांडी करायची सवय असलेल्या मला तिथे बुचूकबुचूक पाण्यात काम करायला जमायचं नाही. आऊ खूप ओरडायची मग. असं काही झालं की मनाला लागायचं पण रात्री परत तिने मायेने कुशीत घेतलं की सगळा राग फुर्रकन् उडून जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी परत गवळ्यांच्या घरच्या हापशावर हंडाकळशी घेऊन रांगेत उभं राहून पाणी भरायला उभी रहायचे ! तिथे येणाऱ्या बायका जशा कमरेवर एका बाजुला हंडा ठेवून किंवा डोक्याच्या चुंबळेवर एक हंडा आणि त्यावर दोन कळशा ठेवून घेऊन एका हाताने तो डोलारा सावरत दुसऱ्या हातात एक कळाशी धरायच्या ते बघून खूप आश्चर्य वाटायचं. असं मलाही जमलं पाहिजे असं मनाशी ठरवून दर वर्षी एकेक पायरी वाढवत वाढवत बरीच प्रगती केली होती. मध्ये एकदा खूपच टंचाई झाली होती पाण्याची तेव्हा दूर कुठेतरी असलेल्या एका विहीरीवर जावं लागायचं पाणी भरायला. रहाटाने पाणी काढणं इथे कोणाला माहिती होतं? आऊच्या पुढे पळत जाऊन मी दोरीला कळशी बांधून ती दोरी चाकावर न चढवता तशीच विहीरीत सोडली होती आणि वाकून ती कशी खाली जात आहे ते बघत होते. वयोमानाने पळणे जमत नसूनही अक्षरशः धावत येऊन आऊने माझ्या एका हाताला धरत मागे खेचत पाठीत जब्बरदस्त धपाटा घातला आणि,"तुझ्यासारख्या शहरी पोरीला नाही जमायचं पाणी काढणं.." असं म्हणाली होती. 'शहरी पोरी' हे शब्द एखाद्या जळजळीत शिवीसारखे भासले होते तेव्हा मला. दुपारी खेळायला न जाता बायका पाणी कशा भरतात हेच बघण्यात मी तो अख्खा दिवस घालवला होता आणि दुसऱ्या दिवशी चुकतमाकत का होईना पण आऊ येऊन धडकायच्या आधीच एक कळशी पाण्याने भरून ठेवली होती. तिच्या डोळ्यातलं त्यावेळेसचं कौतुक आठवलं तर आजही अंगावर सुखद रोमांच उभे राहतात.
पाणी भरणे कार्यक्रम महत्वाचा खरा पण त्यात भाग घेण्यासाठी आधी शुचिर्भूत झालेलं असलं पाहिजे, असा आऊचा खास दंडक होता. आऊ कधीच हाक मारायची नाही उठ म्हणून. तिचं तिचं आवरणं, झाडणं, आंघोळ, स्तोत्रं म्हणणं सुरू होऊन जायचं. जाणूनबुजून दुर्लक्ष करायचं म्हटलं तरी करता यायचं नाही. उठून बसले की आऊ अंथरुणपांघरूण आवरून ठेवायची. लाल दंतमंजन किंवा मग चुलीतल्या राखेत थोडंसं शेंदेलोण मिसळून द्यायची. आऊकडे जाताना माझा इकडचा बाडबिस्तरा नेण्याचं मी जाणूनबुजून टाळायचे. दात घासून झाले की चुलीवर गरम केलेलं पाण्याने आंघोळ करायचे. माझं आवरून होईतो आऊच्या ३-४ खेपा होऊन गेलेल्या असायच्या पाण्यासाठीच्या. "आऊ, मलाही भरायचं गं पाणी.." असं म्हणत मग मी तिच्या मागे लागले की ती एक छोटी कळशी माझ्या हातात द्यायची आणि हंडा किंवा घागर घेऊन ती पुढे निघायची. अंगणातल्या पालेभाजीच्या वाफ्यांना आणि वडपिंपळौदुंबराच्या वृक्षत्रयीला पाणी घालण्याचं महत्वाचं काम झालं की मग मात्र अगदी निवांत असायचा दिवस. त्यानंतरचं षोडशोपचाराने होणारं काम म्हणजे देवांची पुजा ! त्याकरता असतील तर आमच्या अंगणातल्या झाडांची किंवा मग शेजारी फिरून तिथल्या काकूंना विचारून फुले गोळा करून आणून सगळ्या फोटोंसाठी माळा करणे हे काम मी स्वतःहून निर्माण करून करायचे ! पुजेच्या शेवटी आऊ जो शंखध्वनी करायची तो आजही कानात घुमतो आणि मन अगदी प्रसन्नप्रसन्न करून टाकतो.
आऊकडे खाण्यापिण्याची एक वेगळीच चंगळ असायची. मला आवडतात म्हणून ती नेहमी भरपूर बोरं घेऊन यायची, पण तरीही त्या बोरांच्या जाळीत जाऊन पायात काटा मोडून घेऊन स्वतःच्या हाताने बोरं तोडून खाण्यात अपार आनंद व्हायचा मला ! तिच्याकडच्या ठेचा-कांदा-भाकरी, रावणपिठलं-भाकरी प्रमाणेच तिच्याकडच्या दूधभाकरीवरूनदेखिल अगदी कलिजा ओवाळून टाकावासा वाटायचा. अक्षय्यतृतीयेनंतर गेलो तर पुरणपोळीबरोबर आंब्याच्या रसाचा आटाघाटा तर अगदी ठरलेलाच असायचा तिच्याकडे, तिची तब्ब्येत कशीही असली तरी. आऊकडे वीजेचाही खूप मोठा प्रश्न असायचा. ऐन उन्हात वीज नसायची, खूप गरमी व्हायची, तेव्हा मग वडपिंपळौदुंबरत्रयाखालच्या शांत गार सावलीत बसून तिचंमाझं चौपट ( हा कवड्यांचा एक खेळ आहे. )रंगे तर कधी माझ्या मैत्रिणींसोबत माझं सागरगोटे, काचा खेळणे रंगे ! संध्याकाळी आऊ कधीकधी ओरडली तरीही तिचं न जुमानता मी अंगण आणि चूल शेणाने सारवायला घ्यायचे ! तेही शिकायला वेळ लागला होता, पण ते शिकण्यातली मजाच काही और होती. रात्री अंगणातल्या खाटेवर बसून चिमणीच्या उजेडात केलेलं पिठलं भाकरीचं जेवण काय अलौकीक लागायचं सांगू ! जेवणं आटोपली की उन्हाने पत्रे तापलेले असल्याने घरात झोपण्याची सोय नसायची, त्यामुळे अंगणातच खाटा टाकून त्यावर मी आऊशेजारी झोपायचे. आईबाबांकडून ऐकलेल्या उदंड कथा आऊकडून कधीच ऐकायला मिळाल्या नाहीत, तिच्या कथांचा बाजच निराळा होता. एक वेगळंच वातावरण निर्माण व्हायचं माझ्या मनोविश्वात आणि त्यातच रमून कधी झोप लागून जायची कळायचं नाही. मी झोपून गेल्यावरही आऊ बराचवेळ जागी असायची बहुदा.
आऊकडचे नवे नवलाईचे दिवस संपले की आईबाबांची खूप आठवण यायची. आऊ, सगळे दोस्त, वेगळं वातावरण सगळ्या गोष्टी असूनही आईबाबांची ओढ मग त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसायला भाग पाडायची. बाबा येताना दिसले की परत उत्साहाला उधाण यायचं,"बाबा, माझा निकाल काय लागला?" याचं मला अपेक्षित होकारार्थी उत्तर मिळणार याची पुरेपूर खात्रीच असल्याने,"बाबा, मला काय बक्षिस आणलं?" हा पुढचा प्रश्नही तयार असायचा आणि त्यावर बाबांकडून एक बॉलपेन बक्षिस म्हणून मिळणार हेही अगदी ठरलेलंच असायचं. आमचे संक्केत कित्ती कित्ती ठरलेले होते पण तरीही ते जेव्हा खऱ्या स्वरूपात अनुभवायला मिळायचे तेव्हा त्या साध्या पेनातही काय अलोट आनंद गवसायचा हे असं सांगून नाहीच कळणार.
बाबांसोबत आऊकडून परत आलं की मात्र उनाडक्या बंद करून नविन वर्षाच्या वह्यापुस्तकांची खरेदी, त्यांना कव्हर्स घालायला आक्कादादाआईबाबांपैकी कोणाकडेतरी लकडा, शाळा सुरू झाल्यानंतर सुरूवातीच्या दिवसांत दिल्या जाणाऱ्या 'उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवली?' या साचेबंद निबंधविषयासाठीच्या निबंधलेखनाची पुर्वतयारी करणे वगैरे वगैरे आणि परत शालेय जीवनाकडे जायला सज्ज होणे असा एकंदर कार्यक्रम असायचा.
माझा आवडता ऋतू या विषयांतर्गत मी नेहमीच वसंत ऋतूचं वर्णन लिहिलं असलं तरीही या सर्व आठवणींकरता मला उन्हाळ्याचाही विशेष जिव्हाळा वाटतो.
- वेदश्री.