"Its raining men".. Whether Girls चे गाडीमध्ये गाणं जोर-जोरात वाजत होत. आमचा आनंद गगनाला भिडला होता. आणि त्याला कारणही तसंच होतं. आज सगळ्यांचं project submission पूर्णं झाले होते. इतके दिवस चाललेले अथक प्रयत्न, धावा-धाव, शोधा-शोध सगळे काही काळासाठी का होईना संपले होते.
गावाबाहेरच असलेल्या "Toni-Da-Dhaba" वर आम्ही सगळ्यांनी एक मस्त संध्याकाळ घालवली होती. तिथे विश्रांतीसाठी थांबलेल्या ट्रक-ड्रायव्हर्स बरोबर त्यांच्याच गाण्यावर भांगडा केला होता, भरपूर हादडले होते, आणि मदिरेमध्ये ज्याला "मूर्ती लहान पण कीर्ती महान" म्हणतात त्या टकीलाचा एक छोटासा पेग पण रिचवला होता.
घरी परतायला निघेपर्यंत ११ वाजून गेले होते आणि पावसाला मस्त सुरुवात झाली होती. ढाबा सोडून आम्ही high-way ला लागलो. रस्त्यावर दिवे अजिबात नव्हते. "blistering barnacles", "thundering typhoons" आणि असेच काही तरी बोंबलत आम्ही घरी परतत होतो. रस्ता पूर्णं पणे मोकळा होता.. त्यामुळे जास्त काळजी न घेताच मी गाडी पळवत होतो. मध्येच कोणीतरी झाडावर बसलेली हडळ दाखवत होते, तर मध्येच कोणालातरी, आकाशात उडती तबकडी दिसत होती. हास्य विनोद, गप्पांना उत आला होता.
इतक्यात....... रस्त्याच्या मध्ये कोणीतरी मला आलेले दिसले.. मी पूर्णं जोर लावून ब्रेक्स लावले.. पण पावसामुळे रस्ते जाम घसरडे झाले होते.. त्यामुळे गाडी घसरत पुढे गेली आणि कशालातरी आपटून पुढे गेली. कसलातरी.. थडाड..थड्ड.. आवाज झाला. मध्ये काय आले होते ते दिसले नाही पण काही तरी होते नक्की. गाडीत क्षणभर शांतता पसरली. काय होते ते?
कुण्या माणसाला वगैरे तर नाही ना उडवले?. नाही तर "I know what you did last summer" प्रमाणे नंतर तो आमच्या मानगुटीवर बसायचा. प्रिती आणी भावना तर जाsssम घाबरल्या होत्या. मागे वळून पाहिले पण काहीच दिसत नव्हते. सगळे म्हणायला लागले.. जाऊदेत.. चल जाऊ आपण.. पण मला कशाला धडकलो ते पाहायचेच होते. मी खाली उतरलो. गाडीचा एक फॉग लॅम्प फुटला होता. मी मागे चालत जाऊन शोधायचा प्रयत्न करत होतो. गाडीतले बाकीचे पण खाली उतरले. लांबवर काहीतरी पडले होते. मी परत गाडीत गेलो.. आणि गाडी वळवून उलट्या दिशेने आणली जेणे करून, दिव्याच्या प्रकाशात ते काय होते ते तरी दिसेल.
जवळ जाऊन पाहिले तर एक कुत्रं आडवं आलं होतं गाडीची जोरात धडक बसली होती. जबडा जवळ जवळ फाटलाच होता..पायातनं पण रक्त वाहत होतं. सगळ्यांच्या जीवात जीव आला.. हात्तिच्या कुत्रंच आहे होय.. हुश्श..! आपण उगाचच घाबरलो.. चला.. जाऊया.. म्हणत सगळे मागे वळले.
माझी नजर अजूनही त्या कुत्र्यावर होती. ते वेदनेने तडफडत होते.. त्याला असंच सोडून जायचे?.. रस्त्याच्या मध्येच? म्हणजे अजून एखादी गाडी येईल आणि त्याच्या अंगावरून निघून जाईल. जोग्या म्हणाला.. अरे जाउ देना.. कुत्रं तर आहे.. जाईल मरून पण मला काही ते पटत नव्हते. . "ते काही नाही.. आपण याला दवाखान्यात घेऊन जायचे", मी निर्धाराने म्हणालो. प्राणी प्रेमी
असणारी, आणि स्वतःच्या घरीही कुत्रा पाळणाऱ्या प्रितीनेही याला दुजोरा दिला. मग बाकीच्यांचा विरोध पण मावळला.
ते जखमी कुत्रं आहे, चावणार तर नाही ना?, आपल्याला काही रोग तर होणार नाही ना..? असेल विचार मनात येत असूनही थरथरत्या हातांनी आम्ही त्याला उचलले. ते अजूनही विव्हळत होते. कुssई.. कुssई आवाज काढत होते. एव्हाना आम्ही पावसात पूर्णं भिजलो होतो. त्याला गाडीत आणून ठेवले. त्याच्या अंगातून अजूनही रक्त वाहतं होते.. २ मिनिटात सिट्स रक्ताने भरून गेले.
आमच्या अंगालाही त्याचे रक्त लागले होते.
कसे बसे गावात आलो. एका ठिकाणी जनावरांचा दवाखाना सापडला.. तिथे त्याला भरती केले. डॉक्टरांनीही लगेच आवश्यक ते उपचार चालू केले. ३ दिवस ते कुत्रं दवाखान्यात होते. ज्या दिवशी त्याला सोडणार होते, त्या दिवशी आम्ही बिस्किट घेऊन त्याच्या स्वागताला गेलो. कुत्र्याला इमानदार का म्हणतात ते आत्ता कळले..आम्हाला पहाताच ते लगेच पळत-पळत येऊन अंगावर उड्या
मारायला लागले. त्याचे ते डोळे.. ते डोळे.. एखाद्या उत्कृष्ट वक्त्यापेक्षाही जास्त काही बोलून गेले.
पुढे.. प्रिती त्या कुत्र्याला घेऊन आपल्या घरी गेली.. आता तीच्या घरी दोन कुत्री आहेत.. एक ऍना..पहिली पॉमेरीअन, आणि दुसरा हा आमचा..."I know what you did last summer!" वाला हिरो.