जे खरे फक्त ते बोलतो आज मी
का निखाऱ्यांमधे चालतो आज मी?
(बोलताना खरे धाव माझी कुठे?
लंबकासारखे डोलतो आज मी!)
पाकळ्यांसारखी उमलते आज मी
पाखरांशी पुन्हा बोलते आज मी...
खूप आश्वासने ऐकली मी तुझी
शपथ भेटायची घालते आज मी...
बोलका चेहरा... मोकळे हासणे...
ह्या फुलांशी तुला तोलते आज मी
देउनी हात हाती तुझ्या साजणा
सावली होउनी चालते आज मी...
सोडले आप्त! केले जवळ मी तुला
अन् जगाला इथे झेलते आज मी!
- कुमार जावडेकर, मुंबई