सांग सखे सांग मज तुझे एवढेसे गूज ;
सांजवेळी सांग कुणी वाजवला अलगूज ?
का गं नाजूक हळवी गर्द मेघ बरसता ;
ओठंगून का दाराशी सोनऊन्हें उतरता ?
लालेलाल आळत्याने कशी पावले सजली ;
तान सूरिली रेशमी कशी गळा बिलगली ?
कुणा डाळिंबी स्पर्शाने तुज घातली गं मिठी ;
कुणी लाविली देहाला कशी कधी सोनऊटी ?
कोण आले गं रानात तोडावया करवंदं ;
दरवळे चहूकडे धुंद मोगऱ्याचा गंध ?
आता मिटू नको ओठ नको कुठले बहाणे ;
नेत्रपल्लवाने तुझ्या कोण झाले गं दिवाने ?
झाला जास्वंदी चेहरा नको पुसूस 'असे का' ;
'ना, ना' करता करता कशी झाली गं राधिका ?