आटोपल्यावर टॅक्सी पकडून घरी आलो आणि पुन्हा ताणून दिली. दुसऱ्या दिवशीची सकाळ कधी उजाडतेय याची वाट पाहतच झोपलो. न्यू यॉर्क आता एका सूर्योदयावर येऊन ठेपले होते.
पण तो सूर्योदय उजाडलेला पहायलाच मिळाला नाही. पहायला मिळाले ते टळटळीत ऊन आणि घड्याळात वाज़लेला 'दुपारचा' एक! म्हणजे यावेळीही न्यू यॉर्क बोंबलले म्हणायचे ः( पण सुदैवाने देविकामावशी म्हणाली की अज़ून वेळ गेलेली नाही. स्टॅच्यू ऑफ़ लिबर्टी मात्र सायंकाळी पाचला पर्यटकांसाठी बंद होतो. त्यामुळे पटापट आवरून न्यू यॉर्कला ज़ाणारी गाडी पकडणे क्रमप्राप्त होते. सकाळच्या न्याहारीला तिने केलेली थालिपिठे कोंबून आणि अक्षरशः कावळ्याची अंघोळ आटोपून आम्ही घराबाहेर पडलो आणि धावतच गाडी पकडली.
न्यूअर्कला गाडी बदलायची होती. न्यू जर्सी ट्रान्झिटमधून आता आम्ही 'पाथ'मध्ये आलो होतो. ही न्यू यॉर्क मधली मेट्रो रेल. ट्रान्झिटपेक्षा देखणी आणि आपल्या मध्य नि पश्चिम रेल्वेसारखी गज़बज़लेली. ज़रा मुंबईत आल्यासारखे वाटले. गप्पाटप्पा करत मुक्कामी उतरलो. मुक्काम होता 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'. साडेचार वर्षांपूर्वी जेथे ते दोन प्रसिद्ध जुळे मनोरे (ट्विन टॉवर्स) उभे होते आणि लादेनने त्यांवर विमाने आपटवून अनेक निष्पाप जिवांचे बळी आणि असंख्य शिव्याशाप घेतले तेच. सध्या तिकडे फ़क्त शून्य आहे (ग्राउंड ज़ीरो) आणि आधीच्या मनोऱ्यांपेक्षाही जास्त उंचीचे स्मारक उभारण्याचे काम चालू आहे. त्याचबरोबर त्या वास्तूबाबत माहिती देणारे, हल्ल्याबाबत माहिती देणारे नि न्यू यॉर्क शहराने घडवलेल्या माणुसकी व जिद्दीचे गोडवे गाणारे फलक आहेत.


वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ते ज़ुळे मनोरे उध्वस्त करून लादेनने अमेरिकेच्या 'कानाखाली आवाज़ काढला' असे म्हणतात. अमेरिकी आर्थिक स्वायत्तता आणि सार्वभौमत्त्व यांचे प्रतीक, अमेरिका ही जागतिक महासत्ता असल्याची ती निशाणी, प्रत्येक अमेरिकी नागरिकाच्या अस्मितेचा मानबिंदू असे सगळे त्या मनोऱ्यांबरोबरच जेव्हा धुळीला मिळाले त्यावेळी रस्त्यावरचा फाटका अमेरिकनसुद्धा कोट्याधिशाइतकाच हळहळला असेल. आज़ही न्यू जर्सीला मित्रासोबत मॅनहॅटनची आकाशरेषा (स्कायलाइन!) न्याहाळताना त्या मनोऱ्यांची अनुपस्थिती ज़ाणवत होती. आज़वर चित्रातच त्यांना पाहिले होते. प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नव्हता. आणि जेव्हा तो आला, तेव्हा ते तेथे नव्हते (दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत). "दे आर मिसिंग" असे ज़वळच उभा असलेला एक अमेरिकन खेदपूर्वक म्हणाला. मला मात्र तेथे फिरताना खंत लागून राहिली होती, ती जगातल्या अनेक प्रेक्षणीय स्थळांपैकी नि वास्तुशिल्पांपैकी एक नष्ट झाल्याची. तेथे फिरताना ज़वळज़वळ प्रत्येक फलकावर ते ज़ुळे मनोरे माझे लक्ष वेधून घेत होते. आज़ ज़र ते तेथे असते तर कसे दिसले असते, याचाच विचार मी करत होतो. आणि त्याचबरोबर एक विचित्र आंतरीक आनंद झाला होता, तो मुंबईत (आणि भारतात) असे कोणतेही टोलेजंग वास्तुशिल्प नसल्याचा, जे तमाम भारतीयांच्या अस्मितेचे नि भारताच्या राजकीय,आर्थिक वगैरे वगैरे अस्मितेचे प्रतीक आहे (ये मेल्या लादेन! कुठे आपटवणार आहेस विमान? असा तो वन रूम किचन मराठमोळा मध्यमवर्गीय आनंद ः))
वर्ल्ड ट्रेड सेंटरसमोरून सरळ आतल्या बाज़ूस ज़ाणारा रस्ता भटकंतीसाठी निवडला आणि आमच्या पायगाडीला किक मारली. अमेरिकेत आल्यापासून प्रथमच मी 'फेरीवाले' पाहत होतो. हा रस्ता मुंबईच्या फॅशन स्ट्रीटची आठवण करून देत होता. रस्त्यावर बसून खाण्यापिण्याचे जिन्नस, कपडे, अत्तरे, पायताणे इत्यादींची विक्री चालली होती. पर्यटक तसेच स्थानिक इतरेजन खरेदीत रमले होते. आमचा आपला दृष्टीक्रय (विंडो शॉपिंग!) चालू होता. न्यूयॉर्क इतकी रहदारी मी आज़वर अमेरिकेत फिरलेल्या ठिकाणी कुठेच बघितलेली नाही. तो ट्रॅफ़िक डोळेभरून पाहिल्यावर, मी जेथे राहतो त्याला आमच्या स्थानिक मित्रमंडळात 'खेडेगाव' का म्हणतात, ते पटले. आनंदाची गोष्ट म्हणजे आसपासच्या दुकानांमध्ये तसेच रस्त्यावर बरीचशी आशियाई (प्रामुख्याने भारतीय) तोंडे दिसत होती. त्यामुळे परदेशात राहत आहोत ही ज़ाणीव काही काळ पुसली गेली. खूप बरे वाटले. पुढे ज़ातोय तोच फेरीवाल्यांची पळापळ चालू झाली आणि कळले की पोलिसांची धाड पडली आहे. छान! म्हणजे दादर(पश्चिम) स्थानकाबाहेर जशी 'गाडी आली गाडी आली' अशी वर्दी येते आणि सगळे फेरीवाले आपले चंबूगबाळे आवरून पळ काढतात, तसाच काहीसा हा प्रकार. मन सुखावले. पण इथले मामा लोक बहुदा हप्ता घेत नसावेत. कारण दोनच मिनिटात रस्ता पादचाऱ्यांसाठी मोकळा झाला होता ः) अमेरिकेतील ती दादरकर समस्या पाहून माझ्यातल्या दादरकराची छाती अभिमानाने फुलून आली. अमेरिकेतील दहा महिन्यांच्या वास्तव्यानंतर पहायच्या राहून गेलेल्या गज़बज़ाट, रहदारी, आवाज़ या सगळ्या गोष्टी मला 'याचि देही याचि डोळा' अनुभवायला मिळत होत्या.
फिरत फिरत, इकडेतिकडे वाट विचारत आम्ही न्यूयॉर्क शेअर बाज़ाराज़वळ पोचलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेत तुम्ही कोणाला पत्ता विचारला तर ती व्यक्ती गडबडून ज़ाते. घरटी किमान दोन गाड्या घेऊन भटकणाऱ्या अमेरिकन मंडळींना रस्ते नि पत्ते कसे माहीत नसतात, याचे राहून राहून आश्चर्य वाटायचे. मात्र या प्रश्नाला मॅपक्वेस्ट, गूगल मॅप्स, रोड ऍटलस् अशी उत्तरे मिळाली. जिथे जायचे आहे ते ठिकाण, आणि जिथून जायचे आहे ते ठिकाण हे दोन्ही अंत्यबिंदू नोंदवायचे आणि इंटरनेटवरून रस्ते व पत्ते शोधायचे, याची या मंडळींना इतकी सवय आहे, की उद्या त्यांच्यापैकी कोणाला पुण्यात वाडिया कॉलेजच्या आसपास सोडले आणि बुधवार पेठेतल्या पोस्टात ज़ायचे आहे असे सांगितले, तर बिचारा उद्विग्न होऊन आत्महत्या बित्महत्या करायचा. आमच्याकडे अमुक रस्त्यावरचा तमुक पानवाला कुठे आहे, हे कोणीही लीलया सांगतो. त्यासाठी आम्हांला नकाशे गुगलून काढायला लागत नाहीत. येथे मात्र न्यूयॉर्क शेअर बाज़ाराकडे ज़ाणारा रस्ता कुठे आहे, या आमच्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात "दॅट्स ऍक्च्युअली अ गुड क्वेश्चन" अशी होत होती. अमेरिकन माणसाच्या स्थल-दिशा ज्ञानाची कीर्ती ऐकून होतोच, आज़ ती अनुभवायला मिळत होती.
शनिवार असल्याने बरेच पर्यटक होते. हास्यविनोद, छायाचित्रण आणि खाण्यापिण्याची रेलचेल होती. न्यूयॉर्क शेअर बाज़ार आणि तेथील वातावरण पाहून तरी १९२९ च्या जागतिक मंदीत हा बाज़ार रसातळाला पोचला होता आणि अवघी अमेरिका दिवाळखोरीत निघाली होती, हे सांगूनही खरे वाटले नसते. त्याच्या बरोबर समोरच अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग़्टन यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. याच ठिकाणी त्यांनी ३० एप्रिल १७८९ रोजी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती. मग जॉर्जसाहेबांबरोबर एक छायाचित्र काढले. शेज़ारच्या गोऱ्याचा अस्वलसदृश (!) बलदंड कुत्रा आणि ज़वळून चाललेल्या मडमेचे शेंबडे फ़्रेंच पूडल यांच्या प्रेमळ संवादांना कंटाळून आम्ही तिकडून काढता पाय घेतला.




लिबर्टी बेटावर पोचून आम्ही या स्वातंत्र्यदेवतेची, १० महिन्यांची प्रतीक्षा, ग्रे हाउंडच्या प्रवासातले जागरण आणि अर्थातच खर्ची घातलेले शंभर-एक डॉलर्स, या सगळ्याच्या खणानारळाने ओटी भरण्यासाठी आता आणखी अर्धा तास वाट बघायची होती.