अनेक लोकांना अनेक रंग आवडतात. अनेल लोक तर रंगही बदलतात. पण 'पांढरा' रंग आपला बुवा फेवरेट आहे, अर्थात कारणही तसेच आहे. हा रंग मला जिव्हाळ्याचा, माझा वाटतो.
रंग माझा पांढरा ...
गाडी लावली जागेवर
सातची वेळ गाठली
पहिल्यांदाच ती बाहेर
अशी हॉटेलात भेटली
पुढे जाऊन घाईने
कोपऱ्यात टेबल धरला
आठवत नव्हते काय सांगितले
न बघताच वेटरला
'पांढऱ्याला' जर म्हंटले 'होय'
अन् 'काळ्याला' जर 'नाय'
तर माझ्याशी लग्न करशील का ?'
याचे उत्तर काय ?
हसती खेळती पोरगी
एकदम बावरली
आजूबाजूला बघत
मग थोडी सावरली
बोलून टाकले एकदाचे
अन् मान घातली खाली
च्यायला नेमकी तेव्हा
ऑर्डर लवकर आली
चेहऱ्यावरुन कळत नव्हते
काय आता बोलणार
गालामध्ये हसत म्हणाली
'वडा टेस्ट करणार ? '
मला नको वडा !
उत्तर दे लवकर
एक सेकंदात मनात
विचार आले शंभर
जरा लिम्का मागव रे
घसा पडलाय कोरडा
रंगाचे जर म्हणशील
तर बहुतेक आहे 'करडा '
काय बोलतेस कळतेय का ?
आवाज माझा भरडा
' अरे जरा हळू बोल
कशाला आरडा-ओरडा'
हे बघ मला स्पष्ट सांग
पांढरा की काळा ?
पर्समधून मोबाईल काढून
आता करत बसली चाळा
अगं तुला कळतेय का,
काय मी बोलतो !
नसेल उत्तर द्यायचे
तर मग मी चलतो
दर दोन मिनिटांनी
काय रे असा चिडतोस
जसा काही असशील
पण मला आवडतोस
पावसाशिवाय का कधी
इंद्रधनुष्य दिसते ?
तसे काही नसते
तर कशाला आले असते ?
लाजून बघत दुसरीकडे
पोरगी गोड हसली
अलगद फुलांवरती
फुलपाखरे येऊन बसली
पण 'पांढरा' शब्दच म्हणायला
का गं आढेवेढे ?
गुलाबी तिच्या चेहऱ्यानेच
सोडवले सारे कोडे
'बरं बाबा पांढरा ! '
तू म्हणजे ग्रेट
तेव्हापासून पांढरा रंग
आपला फेवरेट !
-( शॅमेलिऑन ) अभिजित पापळकर