फुटबॉल विश्वचषक ०६-भाग १

जगभरात चाललेल्या या महोत्सवात आपणही सहभागी होऊ या !



जगभरातल्या सर्वात लोकप्रिय खेळाची विश्वचषक स्पर्धा जर्मनी मध्ये नुकतीच चालू झाली आहे. एकूण ३२ राष्ट्रे यात सहभागी झाली आहेत. यात युरोपातील ठळक १४ देशांपासून ते अफ्रिकेतील अंगोला,घाना पर्यंतचे देश यात सामील आहेत. शिवाय 'ऑल टाईम हीट'  ब्राझील, इंग्लड, हॉलंड, अर्जेंटिना, इटली, स्पेन, फ्रान्स हे सगळे संघ आहेतच.   चला आपणही रात्रीचा दिवस (आणि काही मनोगतींसाठी दिवसा मेजवानी !) करून या खेळाचा आनंद लुटू या.


खेळातली खरी रंगत दुसऱ्या फेरी पासून असली तरी पहिली फेरीही तितकीच निर्णायक आहे. आत्ता पर्यंतचे विशेष सामने-


ग्रुप ए जर्मनीची विजयी सलामी


९ जून रोजी झालेली पहिली मॅच जर्मनी विरूध्द कोस्टा रिका जर्मनीने ४-२ अशी आघाडी घेतली.  ही मॅच अपेक्षेपेक्षा उत्कंठावर्धक आणि भरपूर गोल देणारी ठरली. जर्मनीचा सुरवातीला घेतलेली ३-१ अशी आघाडी राखायचा प्रयत्न होता. पण ७३ व्या मिनिटाला को.रि. चा वान्चोपे याने जर्मनीने आखलेल्या जाळ्याचा भेद करून गोल ठोकला. हा गोल विशेष उल्लेखनीय ठरला. थोडक्यात हा सामना जर्मनीचा क्लोज आणि कोस्टा रिकाचा वान्चोपे यांच्यात झाला. दोघांचे प्रत्येकी २ गोल.


ग्रुप ए पोलंड विरूध्द इक्यूडर
इक्यूडरने पोलंडला ०-२ असे गुंडाळले आणि ग्रुप ए मध्ये दुसरे (जर्मनी नंतरचे) स्थान पटकावले. उत्तम सांघिक खेळाचे कौशल्य त्यांच्या खेळातून दिसले. पोलंडला जर्मनी विरूद्ध स्थान राखायचे असल्यास बरीच मेहनत घ्यावी लागेल असे या सामन्यातून स्पष्ट झाले.


ग्रूप बी -इंग्लड विरुध्द पॅराग्वे

इंग्लडने अर्थातच चोख काम बजावले. परंतु त्यासाठी चिकाटीची लढत द्यावी लागली. ०-१ जेमतेम १ गोल. तो ही पॅराग्वे च्या कार्लस गॅमेरा याच्या डोक्याला चेंडू लागून झालेला सेल्फ गोल. दुसऱ्या भागातही इंग्लड एकही गोल करू शकला नाही.  पॅराग्वेचा डिफेन्स उल्लेखनीय.

ग्रूप एफ ऑस्ट्रेलिया विरुध्द जपान


ऑस्ट्रेलियाचा टिम काहील याने शेवटी फक्त आठ मिनिटात केलेले दोन गोल ऑस्ट्रेलियाला १-३ असा विजय देऊन गेले. विश्वचषक इतिहासात ऑस्ट्रेलियाने केलेला पहिला गोल नोंदवला गेला.


ग्रूप डी मॅक्सिको विरूध्द इराण


अपेक्षेनुसार मॅक्सिकोने ३-१ अशी विजयी सलामी दिली. परंतु जिंकण्यासाठी मेक्सिकोला शेवटच्या वीस मिनिटांपर्यंत वाट पहावी लागली. शेवटचे दोन गोल निर्णायक ठरले. या विजयामुळे नक्कीच मेक्सिकोचा आत्मविश्वास वाढून  अंगोला शी टक्कर द्यायला उपयुक्त ठरेल. इराणची पुढची लढत पोर्तुगालशी आहे.


अद्ययावत माहितीनुसार ग्रूप ए मधून जर्मनी, ग्रूप बी मधून इंग्लंड, ग्रूप सी मधून अर्जेंटिना, डी मधून मेक्सिको, ई मधून झेक रिपब्लिक, एफ मधून ऑस्ट्रेलिया आघाडीवर.


पहिल्या फेरीतले "नॉट टू बी मीस्ड " सामने पुढच्या भागात.