प्रथम काही ताज्या घडामोडी
१) ग्रूप ए मधून इक्यूडर आणि जर्मनी प्रत्येकी ६ गुण मिळवून दुसऱ्या फेरीत (राउंड ऑफ सिक्स्टीन मध्ये) दाखल. पोलंड आणि कोस्टा रिका खेळाच्या बाहेर.
२) ग्रूप बी मधून इंग्लंडचे दुसऱ्या फेरीतले स्थान निश्चित. पेराग्वे खेळाच्या बाहेर. स्वीडनचेही स्थान जवळजवळ निश्चित. (बाकी भवितव्य २० जून ला ठरेल)
३) ग्रूप सी मध्ये अर्जेंटिना आघाडीवर. आत्ताच झालेल्या सामन्यात अर्जेंटिना ने सर्बिया आणि मॉन्टेनेग्रो (SNG) ला ६-० अशा जबरदस्त फरकाने हारवले आहे.
४) ग्रूप डी मधून मेक्सिको आणि पोर्तुगाल आघाडीवर (प्रत्येकी ३ गुण). आज मेक्सिको विरूध्द अंगोला हा सामना आहे, मेक्सिको ने मात केल्यास मेक्सिको पुढील फेरीत दाखल होईल.
५) बाकी ग्रूप (ई, एफ आणि जी एच ) हे सामने दि. १७ ते १९ जून. १८ तारखेला ब्राझील विरूध्द ऑस्ट्रेलिया हा महत्वाचा सामना बघायचा विसरू नका.
कालपरवाच्या काही विशेष सामन्यांबद्दल
कालचा इंग्लड विरूध्द टि अँड टि (ट्रिनिडॅड आणि टोनॅगो)
२-० असा विजय मिळवून इंग्लंडने दुसऱ्या फेरीतले आपले स्थान निश्चित केले. टि अँड टि ने जवळजवळ शेवटपर्यंत उत्तम बचाव करत इंग्लडला थोपवून धरले. ८३ व्या मिनीटाला इंग्लडच्या पीटर क्राउच ने केलेला गोल आणि ९१ व्या मिनीटाला गॅराड ने केलेलया गोलामुळे (४० यार्ड) इंग्लडच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
विशेष म्हणजे इथेही शेवटच्या मिनीटाला (९२) टि अँड टि च्या जॉन ने इंग्लडच्या जाळयात चेंडू मारला पण तितक्यात 'ऑफसाईड' चा झेंडा फडकला आणि सामना संपुष्टात आला.
उत्तम कामगिरी -डेव्हिड बेक्हम (मॅन ऑफ द मॅच) इंग्लडचा जागतिक कीर्तीचा मिडल फिल्ड स्कीपर बेक्हम याचे 'धोक्याच्या ठिकाणी' चेंडू पास करण्याचे कौशल्य या सामन्यात वारंवार दिसले. ८३ व्या मिनीटाला क्राउच ने केलेला गोल ही बेक्हम ने च दिलेली डिलिव्हरी होती. हा शॉट ज्यांनी प्रत्यक्ष बघितला नसेल त्यांनी तो जरूर बघावा. बेक्हम च्या खेळातला हा सर्वात उत्तम शॉट्स पैकी हा एक असेल. प्रचंड लाबून त्याने क्राउच ला चेंडू दिला अन तो जाळ्यात पोहोचला, बाकी सर्व खेळाडू काहीही करू शकले नाहीत ! अप्रतिम डिलिव्हरी !!! दुसरा, गॅराडने केलेला थेट गोलही सर्वात लांबून केलेल्या गोलांपैकी एक होता.
इक्यूडर विरूध्द कोस्टा रिका (को. रि.)
इक्यूडर ने को. रि. चा ३-० असा दणदणीत पराभव केला आणि पुढच्या फेरीतले आपले स्थान निश्चित केले. ८ व्या मिनीटाला Tenorio, ५४ व्या मिनीटाला Delgado आणि ९२ व्या मिनीटाला keviedes यांनी केलेल्या गोल मुळे को. रि. चे विश्वचषक०६ खेळातले स्थान संपुष्टात आले. इक्यूडर प्रथमच दुसऱ्या फेरीत प्रवेश करत आहे.
स्वीडन विरूध्द पॅराग्वे
स्वीडनचा पॅराग्वे वर १-० असा विजय. पॅराग्वे खेळाच्या बाहेर. या विजयामुळे दुसऱ्या फेरीत स्वीडनही इंग्लंड बरोबर खेळून फुटबॉल रसिकांना दुसऱ्या फेरीत युरोपीयन चुरस बघायला मिळणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.
स्पेन विरूध्द युक्रेन (१४ जून)
ग्रूप एच मध्ये स्पेनच्या या खेळातल्या पहिल्या सामन्यात स्पेन ने युक्रेन ला ४-० असे जबरदस्त फरकाने गुंडाळले. आत्तापर्यंतचा या विश्वचषकातला हा सर्वात मोठा फरक होता. (आत्ताच अर्जेंटिनाने हा विक्रम मोडला आहे) स्पेन आत्तापर्यंत १२ वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. युक्रेनचा हा पहिला विश्वचषक सामना होता.
बेक्हम-क्राउच ने केलेला कालचा गोल पाहून एका इंग्लड चाहत्याच्या चेहऱ्यावर झळकलेला आनंद-
दुसऱ्या फेरीत कोण कोण पोहोचणार ते आता जवळजवळ निश्चित झाले आहे, सगळीकडे विश्वविजेता कोण या चर्चेला उधाण आले आहे. कालच्या सामन्यामुळे इंग्लंडच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आजच्या सामन्यामुळे अर्जेंटिना चा खेळ ही जगापुढे आला आहे. यजमान जर्मनीने तर या शर्यतीत दुसऱ्या फेरीसाठी पहिला नंबर लावला आहे. तर आत्तापर्यंतच्या सामन्यांवरून, खालील पर्यायांना उतरत्या क्रमाने लावा पाहू.. म्हणजे ज्या देशाचा खेळ तुमच्या दृष्टीने सर्वात चांगला तो पहिला.
१) इंग्लंड २) जर्मनी ३) ब्राझील ४) अर्जेंटिना ५) इक्यूडर ६) स्वीडन ७) ऑस्ट्रेलिया ८) मेक्सीको ९) झेक रिपब्लिक १०) स्पेन
काही महत्वाच्या सामन्यांनतर (२० जून नंतर) पुन्हा हजर होईन.
तोपर्यंत,
आपल्या आप्तमित्रांच्या समवेत रात्री जागवा आणि या खेळाचा आनंद लूटा.
--मेघदूत.