आला पाऊस..
आला पाऊस आला पाऊस
मेघांमधूनी झरला पाऊस
आभाळाची झूल पांघरित
दरीदरींतून भरला पाऊस..
आला पाऊस आला पाऊस
मातीमध्ये रूजला पाऊस
नितळ रुपेरी नक्षीसंगे
पानोपानी सजला पाऊस..
आला पाऊस आला पाऊस
सोडून संयम सुटला पाऊस
एकांताच्या बुरुजावरती
वाऱ्याने मग लुटला पाऊस..
आला पाऊस आला पाऊस
माथ्यावरती उनाडलेला
निळ्यासावळ्या डोहामध्ये
धुंद लालसी बुडला पाऊस
आला पाऊस आला पाऊस
कडेकपारी खळाळलेला
मातीवरच्या कशिद्यावरूनी
रानोरानी फिरला पाऊस
आला पाऊस आला पाऊस
मनी मानसी उधाणलेला
आसक्त अंगी वादळवारे
रिते करूनी सरला पाऊस..
आला पाऊस आला पाऊस
वाटेवरती झुरला पाऊस
धुक्याधुक्यातील गूढ पाऊली
मनात माझ्या उरला पाऊस..
अ-मोल