पहिल्या पावसाच्या तीन रात्री
रात्र पहिल्या पावसाची
पाणी भरल्या शेतांची,
मऊ,फुटल्या ढेकळांची,
मायेनं पोसलेल्या;
हिरव्या स्वप्नांत जागण्याची
अन् चिंब चिंब भिजण्याची.
रात्र पहिल्या पावसाची
केसांत गुंतल्या जीवाची,
गोड भिजल्या श्वासांची,
एकमेकांत हरवतांना;
उबदार मीठीत जागण्याची
अन् चिंब चिंब भिजण्याची.
रात्र पहिल्या पावसाची
छत बनल्या निंबाची,
शर्ट भिजल्या पोराची,
रिमझिमत्या पावसाला
डोळ्यांत घेऊन जागण्याची
अन् चिंब चिंब भिजण्याची.
-गिरीराज