मारवा
रत्नजडित ही कांती तुझी अन्
दिपती डोळे माझे का?
तुला पाहुनि फूल ऊन्हातील
फिरुनि तवाने ताजे का?
घनगंभीर ही वाट नभातील
अंतरातल्या निळाईपरी
मनगाभाऱ्यातील नाद अनामिक
होऊनि मुरली वाजे का?
तव-नक्षत्रांचे देणे घेता-
घेता थकतील हात पुन्हा
अन जरा पाहता चोरून तुजला
नवयौवनकलिका लाजे का?
बहर तुझ्या निशिगंधा येता
मृद्गंधाहुनि दरवळ उठता
तवस्वप्नांच्या गावातुन निघता
चंद्रस्पर्शही मज भाजे का?
अन कलंडताना सूर्य जरासा
समई-मधुनि जळताना
तुझा मारवा तुझ्याविनाही
गीत होऊनि गाजे का?
-----स्वप्निल