एखादी घटनाच मुळांत विचित्र असते, कधी बातमी लिहितांना त्यातील घटनेचे सविस्तर वर्णन करण्यात गफलत होते तर कधी तिच्यावर आलेल्या प्रतिक्रिया वाचून हंसू येते. क्वचित प्रसंगी हंसावे की रडावे तेच कळत नाही. अशा सर्व गोष्टी नवलाईच्या वाटतात व मौजमजा या मथळ्याखाली मी एक गंमत म्हणून देत आलो आहे. कोणावर दोषारोप, टीकाप्रहार, शरसंधान वगैरे करणे, वादविवाद सुरू करणे हा यांत उद्देश नाही. वाचकांनी याचतांना याच भूमिकेतून पहावे अशी नम्र विनंति.
अलेक्झॅंडरला कोणी जगज्जेता म्हणतात. त्याला जिंकायला पृथ्वीच उरली नाही म्हणून तो रडला अशी एक दंतकथा आहे. ती सपशेल चुकीची आहे हे आपल्याला माहीत आहे. अंभी नांवाच्या फितुर राजाच्या सहाय्याने तो भारतावर चालून आला पण त्याची शूरवीर पुरु राजाशी गांठ पडली. त्याने कडवा प्रतिकार करून अलेक्झॅंडरला सीमेवरून परत जा असे ठणकावले. पुढे अलेक्झॅंडरने लढाई जिंकली पण आपल्या वागणुकीने व वाक्चातुर्याने पुरूने त्याचे मन जिंकले व तो मोठ्या मनाने पुरूला त्याचे राज्य परत करून आल्या पावली परत गेला अशी कांहीशी गोष्ट आपण ऐतिहासिक नाटक सिनेमामध्ये पाहतो. नटवर्य सोहराब मोदी व पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या खर्जाच्या दमदार आवाजातील फर्ड्या वक्तृत्वाने त्यातील पात्रे अजरामर केली आहेत. दूरदर्शनवरील चाणक्याची मात्र फक्त केशभूषाच स्मरणांत राहिली.
या विषयावर एका आघाडीच्या मराठी दैनिकामध्ये नुकताच आलेला लेख वाचला. एका इंग्रजी संशोधकाचा हवाला देऊन त्या मराठी लेखकाने सांगितले आहे की अलेक्झॅंडर हा एक अविचारी, दुर्वर्तनी व दुर्व्यसनी राजा होता. अंभि हा देशभक्त होता पण नाइलाजाने त्याला शरणागति पत्करावी लागली. अलेक्झॅंडरचे मांडलिकत्व पत्करून त्याने त्याच्या गोटांत शिरून आंतून फितुरी केली, दुफळी माजवली, चंद्रगुप्ताचे प्राण वाचवले व शेवटी पावसाळ्याच्या दिवसांत लढाई करवली. त्यात निसर्गाचा प्रकोप आणि पुरु, चंद्रगुप्त, चाणक्य व अंभी यांचे शौर्य यापुढे अलेक्झॅंडर चारी मुंड्या चित होऊन सिंधमार्गे पळाला व क्षीण होत गेला. शेवटी प्रत्यक्ष त्याच्या डूख धरून बसलेल्या गुरूने बाबिलोन इथे विषप्रयोग करून त्याची हत्या केली म्हणे.
खरे खोटे देव जाणे पण हे सर्व सत्य असले तरी पुढे काय? सीमेवरील तो प्रदेश आता पाकिस्तानांत आहे. म्हणजे आतां हा कुणाचा इतिहास आहे ? पाकिस्तानचे राज्यकर्ते अंभि, पुरु वगैरेंना मानतात कां? इतिहासाच्या पुस्तकांतील तो धडा कोण बदलणार? "सिकंदरने पोरससे की थी लडाई। जो की थी लडाई तो मै क्या करूं" असेच बहुतेक लोक म्हणणार ना? आणि या विषयावरील सा-या सुप्रसिध्द नाटक, कादंब-या, सिनेमे यांचं काय करायचं? सगळा घोळच आहे.