तसा नसे मी इथे एकटा किती सखे सोयरे किती
तरी कोणती उरी पोकळी खोल खोल घालते भिती
असा भोवती सदा गराडा, सदा मैफिली जमलेल्या
कसा जुळेना सूर कुठेही.. किती साज, आवाज किती
रोज आसवे पिऊन देखिल नशा कशी ना चढे मला
किती झोकती, किती झिंगती, तरी त्यात रंगती किती
उरी झेलतो घाव, घडवितो नवीन शब्दांची शिल्पे
आणि आंधळे चोर तयांना बघून माना डोलविती
सूख जाहले बटिक तयांची, जखमा माझ्या पतिव्रता
सगळ्या माझ्या कवनांमध्ये दरवळते त्यांची प्रीती..