आत मीही ठरवलंय....

आता मीही ठरवलंय... शहाण्यासारखं वागायचं
तुला त्रास होईल असं काहीच नाही करायचं!


उचंबळणाऱ्या आवेगांना मनातच दाबून धरायचं
आठवण आलीच तर... स्वतःशीच झुरायचं
रिमझिमणारा पाऊस पाहून मनातच रडायचं
स्पर्श मोरपीस आठवून स्वतःशीच हसायचं
खूपच दाटून आलं तर... स्वतः उन्मळून पडायचं
पण... तुला त्रास होईल असं काहीच नाही करायचं !


माहीत आहे, कठीण असलं तरी स्वतःला सावरायचंय...
वादळलेल्या भावनांना स्वतःहूनच आवरायचंय...
दरवळलाच जर गंध तुझा... स्वतःशीच बावरायचं
कुणी तुझं नाव घेतलंच तर... मनाशीच हरखायचं
समोर जर का आलास तू... पापण्यांमध्येच दडवायचं
पण... तुला त्रास होईल असं काहीच नाही करायचं !