प्रथमं वक्रतुंडंच...

माझी एकाग्रता (?!) म्हणजे एक न उकललेलं कोडं आहे माझ्यासाठी. कधीकधी काहीच न ठरवता हाती घेतलेल्या कामात पूर्ण एकरूप होऊन जाऊन अत्यंत झकासपणे हातावेगळं करून मोकळी होऊन जाते तर कधीकधी नाही तर नाहीच सूर जुळत. नक्की काय केल्याने मन एकाग्र होतं आणि काय केल्याने नाही, हे मी शोधायच्या कधीच फंदात पडले नाही हे मात्र अगदी खरं आहे.

हे असं सगळं असूनदेखील आज जेव्हा सकाळी वसतिगृहात बसवलेल्या गणपतीचे दर्शन घ्यायला गेले, तेव्हा एक झकास अनुभव आला. झालं काय की तिथे कर्ण्यावर मोठ्या आवाजात सुंदर भक्तीगीते लागली होती. नेहमीच्या सवयीने मी आत गेले, हात जोडले आणि डोळे मिटून भक्तीगीतांच्या बॅकग्राउंड म्युझिकमध्ये माझ्या सरधोपट चालीतलं गणपतीस्तोत्र म्हणायला सुरूवात केली. म्हणताम्हणता मी 'प्रथमं वक्रतुंडंच..' म्हणायला आणि कर्ण्यावरील गीत बदलून 'जशी चिकमोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची गं..' गाणं सुरू व्हायला एकच गाठ पडली ! माझ्या तोंडी 'वक्रतुंडंच..'च्या पुढचा शब्दच यायला तयार नाही ! पटणार नाही तुम्हाला कदाचित पण अगदी निमिषार्धात मागच्या भूतकाळात भटकून परत आले. ते गाणं, त्याच्या शब्दलयीवर एका नर्तिकेनी केलेलं अतीव सुंदर नृत्य - जे दूरदर्शनवर दाखवलं गेलं होतं, तिच्या स्टेप्स बघून मी आणि श्रीने तसंच नाचायचा केलेला अयशस्वी प्रयत्न.. वगैरे वगैरे सगळ्या फुटकळ गोष्टी त्या निमिषार्धात माझ्या मनात तरळून गेल्या. माझं मन जेव्हा पुढच्याच निमिषार्धात परत स्तोत्रावर आलं तेव्हा 'वक्रतुंडंच'च्या पुढचा शब्द शोधायला मनाच्या कानाकोपऱ्यात जंग जंग पछाडलं पण नाही तर नाहीच मिळायला त्याला तो शब्द ! 
माझंच वस्ताद मन मलाच दूषणे द्यायला लागलं.
'काय हे? तुला साधं स्तोत्रही येईना? थू आहे तुझ्या जिंदगानीवर..'
भोळं मन भोळं असलं तरी असले आरोप सहन करून गप्प बसेल? शक्यच नाही..
'जरा गप्प बस. परत एकदा सुरूवात केली की आपोआप येईल तो शब्द माझ्या तोंडून बाहेर. असा नाही सापडायचा तो शब्द मला..'
'कराऽऽऽ पर्रऽऽत सुरुवात करा.. पण पडू दे जरा काही उजेड.. '
वस्ताद मनाची तानाशाही संपुष्टात आणायला मी, तसंच काहीशा बावरल्या मनाने मी कसेबसे एकेक शब्द उच्चारत परत स्तोत्र म्हणायला सुरूवात केली. चुकलं तर हे वस्ताद मन काय काय म्हणेल मला? या विचाराने धडधडत होतं माझं हृदय.. पुढचा शब्द आठवतो की नाही याची धास्ती सदोदित होती भोळ्या मनात.
'त्या शब्दाची जागा जवळजवळ येतेय.. आतातरी आठवला का? आठवला का?'
वस्ताद मनाच्या या हैराण करवणाऱ्या प्रश्नाच्या भडिमाराला गप्प करण्याच्या प्रयत्नात माझं भोळं मन गुंतलं आणि...... व्हायला नको तेच झालं ! माझी स्तोत्रगाडी 'वक्रतुंडंच..' पर्यंत येऊन परत अडकली !
वस्ताद मन जणु काही याचीच वाट बघत असल्यासारखं विकृतपणे हसायला लागलं. भोळ्या मनाच्या डोळ्यात (!!!) अश्रू तरळले. दोन मिनिट तशीच मी उभी दिग्मूढासारखी तिथे काय करावं ते कळतच नव्हतं.
'तू आणि मी वेगळे आहोत का? माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना अपयश मिळता तुला असा आनंद का होतो? हुरूप द्यायचा सोडून तू खच्चीकरण का करतोस माझं?' भोळं मन आक्रंदलं.
'अरे येड्या, तू मला चान्स दिलास रे दिलास की मला तुला सतावायला भारी आवडतं. आत्ता तूच बघ तुझं पूर्ण मन होतं का स्तोत्रात? असतं तर अडकायला झालंच नसतं.. तू अटकलास, मला चान्स मिळाला तुझ्यातून बाहेर निघून तुझ्यावर चिडवाहसायला, मी हसलो.. हे बघ असाऽऽ' असं म्हणून वस्ताद मन परत हसायला लागलं.
भोळं मन मनातल्या मनात म्हणालं,'वस्ताद जरी वस्ताद असला तरी म्हणण्यात काहीतरी मेख आहे. मला चॅलेंज देतोय का? आता ऐकच स्तोत्र..'
एकदम एक आगळीच झिलई चढली शब्दोच्चारांवर, एक आगळाच विश्वास वाटला भोळ्याला त्याच्या स्वतःवरच आणि एकेक शब्द पुढच्या शब्दाकरताच्या शोधाबद्दल पूर्ण बेफिकिर होऊन माझ्या तोंडून शब्द बाहेर पडायला लागले. अजूनही बॅकग्राउंडला 'चिक मोत्याची माळ..' होती आणि 'गणपती किती हासला...' ही होता ! म्हणतम्हणत मी 'वक्रतुंडंच..' पर्यंत आले आणि पुढचा 'एकदंतं..' कधी तोंडून ओघळला माझं मलाच कळलं नाही. एका वेगळ्याच आनंदपर्वात गेले होते मी.. भानावर आले तेव्हा नुसतं स्तोत्रच नाही तर अथर्वशीर्षही म्हणून झालेलं होतं !!!
भोळ्याला जब्बरी आनंद झाला.
'वस्ताद, कुठेयस तू? ऐकलंस का स्तोत्र?'
'येडू, मी तुझ्यातच आहे आता !'

आज इतकं धमाल वाटत आहे की बस्स !