कुशाग्र म्हणजे बरं का मित्र माझ्या वडिलांचे
खरंतर त्याहूनही वडील माझ्या मित्राचे
त्यांच्या आलं मनात एकदा ...
लेकाकडे जावं
चार दिवस राहावं
तूप रोटी खाऊन
मग परत यावं
असे ते आले असता त्यांच्या लेकाच्या गावाला
फोन केला मित्राला मी काय म्हणतात बघायला
मित्राशी झाल्या गप्पा, त्याच्या आईशीही बोलणे झाले
नंतर मी त्याला विचारले, अरे बाबा कुठे गेले ?
संगणकापाशी बसले आहेत, झाले आहेत गुंग
मनोगत आपले सांगण्यात झाले आहेत दंग
इतक्यात ते आलेच आणि घेतला त्यांनी फोन
मग आमच्या झाल्या शिळोप्याच्या गप्पा दोन
त्यात त्यांनी सांगितली मनोगताची कहाणी
करता येतात चर्चा अन् लिहिता येतात गोष्टी-गाणी
इंटरनेटच्या महासागरात असाही आहे एक बिंदू
मराठीप्रेमी मनांच्या मिळत आहेत जेथे सिंधू
एवढे काय असेल खास, मीच म्हणालो माझ्या मनात
लाखो असतात असल्या गोष्टी इंटरनेटच्या मायाजालात
तरीसुद्धा गेलो तिथे अन् केली माझ्या येण्याची नोंद
आऽ वासून बघत राहिलो मिटलेच नाही माझे तोंड
खेळण्यांच्या दुकानातील मुलासारखे माझे मन झाले
काय वाचू अन् काय नको, माझे मलाच न कळे
ओळख करून दिल्याबद्दल या ठिकाणाची सुंदर फार
मनापासून मानत आहे मी कुशाग्रांचे आभार