मी विद्यार्थीदशेत असतांना एका संघटनेचे शाखाप्रमुख मला त्यांच्या संघटनेचा स्वयंसेवक होण्याचा आग्रह करीत होते. त्यावेळी त्यांच्या बोलण्यांत एकसारखे "संघशक्ति कलीयुगे" हे सुभाषितवजा वाक्य येत होते. मी त्यांच्या संघटनेत गेलो नाही. पण अनेक माणसे असलेल्या संघटनेची शक्ति एका माणसाच्या शक्तीपेक्षा नक्कीच ज्यास्त असणार या साध्या गणिती तर्काने ते सुभाषितवजा वाक्य मात्र मला पटले होते.
पुढे नोकरींत असतांना मला कामगार संघटनांना तोंड द्यावे लागले. त्याचा काही प्रमाणांत त्रासही झाला. त्याच सुमारास एका अग्रगण्य मराठी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या एका लेखांत "सत्य असंघटित असते व असत्य संघटित असते" हे वाक्य वाचनांत आले. युनियनच्या कारवाया व राजकारण पाहिले असल्यामुळे ते विधान पटले.
वरील दोन्ही वाक्यांवरून खालील (तर्काधिष्ठित) अनुमाने निघतात.
१) सध्याचे कलीयुग हे असत्ययुग आहे.
२) संघटना असत्याच्या पायावर निर्माण होतात, टिकतात व वाढतात.
३) संघटना आकाराने व वयाने जितकी मोठी तितका तिच्यांत अधिक अप्रामाणिकपणा असण्याची शक्यता असते.
४) लोकशाहींत संघशक्ति कार्यरत असल्यामुळे सत्याला स्थान मिळणे कठीण असते.
आपणांस काय वाटते?