चहूकडे पसरलेली
ही कापूसस्पर्शी वाळू
अन वर हे
रणरणते पिवळेधूप ऊन.....
उंटाच्या खुरागत ऊमटलेली ही पावले,
अस्तित्वाचे एकेक मोती होऊन
बकुळीच्या वळेसरागत,
एकात एक गुंतून राहीली आहेत
आठवणींच्या धाग्यासवे.........
होरपळीची संवेदनाच हरवलीय
शोधता शोधता या वाळवंताचा अंत.........!
ते मृगजळ बोलावतय
अन चकवा झाल्यागत
डोळे वेडेखुळे
तुला पहाताहेत
पार पल्याड काठावर
पण तहान तर केव्हाचीच शमलीय........!
खजुराच्या गोडीगत
तुझं 'असणं' तेव्हढं खरं आहे....!
जिभेवर हुळहुळत रेंगाळणाऱ्या
अवीट चवीगत........
शीला.