द्रव्यसंचयाच्या भोगात माझे
राहती न कोणी पापात माझे
मज भणंग असता उपदेश केले
तेच आज प्याले भरतात माझे
एक मीच नव्हतो प्रेमाभिलाषी
अन् रिपू निघाले निष्णात माझे
ती असे समोरी की भास आहे?
सूर का विराणी गातात माझे?
ओठ गायिकेचा मिरवेल लाली
रक्त ओतले मी गझलांत माझे
कैक राख झाले परंतु शमा त्या
नाव आदराने घेतात माझे
शब्दकाजवे ते 'विक्षिप्त' विझले
शब्ददीप अजुनी जळतात माझे