जाणले मी ते न माझे गाव होते...
जेथल्या नात्यास नुस्ते नाव होते...
शेकडो वेळा कळ्या कोमेजलेल्या...
शेकड्याने मोडलेले डाव होते...
कैकदा राजा भिकारी जाहलेला...
आपल्यांनी साधलेले डाव होते...
जेथल्या काट्यांवरी मी प्रेम केले...
आज तेथे पाकळ्यांवर घाव होते...
लाज होती लक्तराने झाकलेली...
अन चढ्या बोलीत त्यांचे भाव होते...
ती न होती माणसे माणूसकीची...
श्वापदांनी आणलेले आव होते...
एकट्याने चालताना जाणले मी...
काळजाने सोडलेले ठाव होते...