आजवर माझी झेप काही चारोळ्या व मोजक्याच कवितांपुढे गेली नाही. 'मनोगत' वर एका पेक्षा एक अशा अप्रतिम गजलं वाचून, मलाही गजलं रचण्याचा मोह झाला, आणि मला तो काही केल्या आवरता आला नाही. गजलं हा काव्यप्रकारातला किती उच्च व श्रेष्ट दर्जा आहे हे माझ्या सारख्या एका चारोळीकरानं अनुभवलं. चारोळी कशी पटकन सुचते, पण मला एक गजलं रचताना, झालेला गोंधळ, शब्दांची मारामारी, भावनांचा अभाव - हे माझं मलाच महीत आहे. तरीही मी आशा करतो की, माझी ही पहिली गजलं, तुम्हाला चांगली वाईट कशीही वाटली, तरी मला मार्गदर्शन मात्र जरूर करा.
ना कशाची तक्रार आता, ना कोणावरही राग मला
ना कळलो मी जगाला, ना कळले जग मला
वेदनांनी मज गोंजरले, दुःखांनी मज कुरवाळले
मग, तूही दे आसवांचे नव्याने ढग मला
निजलो आज शांततेत, ज्या मृत्युच्या कूशीत
दोन फुले घेऊन येशील, का आशेची जाग मला
अंधारात मी मिटली होती, पापणी माझ्या दु:खांची
मग, का दिला जिवना, पुन्हा काळा रंग मला
जिवना तुझ्या गणिताचं, तूच उत्तर सांग मला
ना कळलो मी जगाला, ना कळले जग मला
सनिल पांगे