"valentine day" तरूणांचा सणा-सुधीचा दिवस. हा दिवस गोड करण्यासाठी माझा एक संपुर्न चारोळी संग्रह ("प्रेमाचा इंद्रधनू) तुमच्या करीता पोस्ट करत आहे. आशा करतो तुमचा हा दिवस नक्कीच गोड जाईल.
चला मग माझ्या ह्या इंद्रधनूच्या रंगात, तुम्ही तुमच्याही कवितेचे रंग मिसळा. आसमंती असा एक इंद्रधनू कोरूया की कवितेचं नभ रंगाने उधळून जाऊदे.
"प्रेमाचा इंद्रधनू"
जिवनाच्या एका नाजूक वळणावर
भावनांच्या सागराला प्रलय येतो
प्रत्येकाच्या जिवनात कधी ना कधी
"प्रेमाच्या इंद्रधनूचा" उदय होतो
प्रेम म्हणजे भावनांच्या आकाशात
उत्तुंग मारलेली भरारी असते
स्वप्नांच्या विश्वात अधांतरी तरंगताना
नकळतच हृदयचं फरारी असते
प्रेमात हवी फक्त एक नजरभेट
स्वप्नांचे झोके झुलण्यासाठी
अवचित हलकेच स्मित हास्य
अक्षतांचं चांदणं झेलण्यासाठी
प्रेम म्हणजे भावनांपुढे
विचारांनी हार स्विकारलेली
प्रेम म्हणजे मनापुढे
मेंदूने शरणागती पत्करलेली
ठराविक व्यक्तीवर प्रेम करायचं
असं कधी ठरवायचं नसतं
प्रेमाचय रणभूमीवर
फक्त हृदय हरवायचं असतं
प्रेम म्हणजे रात्रभर
स्वप्नांचे झुलणारे झोके
प्रेम म्हणजे नाजूक स्पर्शाने
हृद्याचे वाढणारे ठोके
प्रेम म्हणजे संकटातही
पाठीशी उभी राहणारी स्फूर्ती
प्रेम म्हणजे मनाच्या मंदिरात
हाडामासाची पुजलेली मूर्ती
प्रेम म्हणजे कुंकुवाच्या रूपात
कपाळावर सौभाग्याचं रूजणं
प्रेम म्हणजे मंजळसुत्राच्या रूपात
गळ्याभोवती विश्वासाचं सजणं
प्रेम म्हणजे वेडं होणं
गर्दीत सुद्धा एकटं वाटणं
दूर कुठेतरी आकाशात
भावनांच्या चांदण्यांचं दुकान थाटणं
प्रेम म्हणजे भावनांचा समुद्र
ओहोटीचा नसून फक्त भरतीचा
प्रेम म्हणजे हृदयाचा तो प्रवास
मार्ग नाही जिथे परतीचा
खऱ्या प्रेमाचा अर्थ
खरचं किती खोल असतो
एकाच्या डोळ्यात इवलासा अश्रू
दुसऱ्यासाठी प्राणांहून अनमोल असतो
प्रेम म्हणजे भावनांचं आभाळ
ज्याला कुठेच अंत नाही
प्रेमाखातर प्राणही गेला
तरी मनाला त्याची खंत नाही
प्रेम म्हणजे बंधन
प्रेम म्हणजे स्पंदन
प्रेम म्हणजे स्वतः झिजून
इतरांसाठी सुवासणारं चंदन
कधी कधी असंख्य भेटी घडूनही
प्रेमाची भावना जागत नाही
तसं प्रेमात पडायला कधी कधी
ती भेटचं घडावी लागत नाही
प्रेम म्हणजे दोन मनांना
आपुलकीनं जोडणारा सेतू असतो
प्रिय व्यक्तीच्या सुखासाठी धडपड
हाच प्रेमाचा निरागस हेतू अस्तो
प्रेम म्हणजे प्रियजणांच्या
चेहऱ्यावर उमटणारा हर्ष असतो
प्रेम म्हणजे जिवात दडलेल्या
आत्म्याचा स्पर्श असतो
प्रेम म्हणजे भावनांची ठिणगी
जी हृदयात अवचित पेट घेते
जीवनाच्या एका नाजूक वळणावर
अविस्मरणीय स्वप्नांची भेट देते
प्रेम म्हणजे क्षितीज
मिलन दोन मनांचं
प्रेम म्हणजे ते शिखर
दोन जिवांच्या आपलेपणाचं
प्रेम म्हणजे दोन मनांचा सेतू
जो भवनांशिवाय बांधता येत नाही
प्रेम म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन
नुसतं स्पर्शानेच साधता येत नाही
प्रेम म्हणजे आठवणीत वाहणं
प्रेम म्हणजे विचारात राहणं
प्रेम म्हणजे कल्पनेच्या नजरेतून
स्वप्नांचं रम्य विश्व पाहणं
प्रेम म्हणजे वहीत एखादं
गुलाब जपून ठेवलेलं
प्रेम म्हणजे मनात एखादं
प्रतिबिंब लपून ठेवलेलं
प्रेम म्हणजे सुरळीत मार्गावरही
पावलांचं अचानक अडखळणं
प्रेम म्हणजे झोपेत अलगद
उशीला हळूच कुरवाळणं
प्रेमात हे असचं असतं
संभाषणाचा भार डोळे पेलत असतात
ओठ जरी स्थिर राहिले
तरी डोळे मात्र बोलत असतात
प्रेम म्हणजे प्रियजणांच्या सहवासात
मिळणारी शीतल छाया असते
तर कधी आईच्या कुशीत
फुलणारी वेडी माया असते
प्रेम ह्या दोन अक्षरातच
जीवनाचा खरा अर्थ दडला आहे
त्या अर्थाच्या शोधातच तर
एक जीव दुसऱ्यावर जडला आहे
प्रेम असं बंधन आहे
जे कोणासही चुकलं नाही
असं एकही हृदय नाही जिथे
प्रेमाचं चांदणं लुकलुकलं नही
प्रेम म्हणजे विश्वास
प्रेम कधी ठरते शिक्षा
प्रेम म्हणजे पतिव्रता सीतेनी
दिलेली अग्नी परीक्षा
खरं प्रेम एकदाच होतं
ते कधीही विसरता येत नाही
शुद्ध, हळव्या भावनांचं आभाळ
अनेकांवर पसरता येत नाही
प्रेम हे असचं असतं
थोडसं हसवतं, थोडसं रडवतं
कधी शून्यात आणून सोडतं
तर कधी शून्यातून विश्व घडवतं
"प्रेम" .... शब्द दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि उच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो
कशी वाटली ही प्रेमाची मिठाई, च्योकलेट, आईसक्रिम..... वैगरे वैगरे... अभिप्राय जरूर कळवा
....... सनिल पांगे