नुकतीच घडलेली घटना-
नेहमीच्या घाई गडबडीत दुचाकीवरून कामे साधत भटकंती सुरू होती....
दादरला सेना भवनचा वाहतूक नियंत्रक दिवा ओलांडून पोर्तुगीज चर्च कडे आगेकुच करीत होतो.... जुन्या कंपनीत नोकरी करताना हा रोजचा रस्ता असायचा... ह्या आठवणी मनात आणत पुढे सरकत होतो इतक्यात सुश्रुषा हॉस्पिटलच्या चौका जवळचा दिवा हिरव्याचा पिवळा होताना बघीतला....
पटकन पुढे निघून जावू ह्या मनात आलेल्या चोरट्या भावनेने विचारांना जिंकले व मी तो दिवा पिवळ्याचा लाल होण्या आधीच चौक पार केला....
तसे बघायला गेल्यास हे असे मी कधी कधी केलेही असेन - व ही काही पहिलीच वेळ नव्हती....
झाडाखाली फटफटीवर ठाण मांडून बसलेल्या साहेबांनी आपल्या सहकाऱ्यामार्फत थांबण्याचा इशारा केला..... मनोमन साहेबांच्या सात पिढ्यांचा उद्धार करीत मी दुचाकी बाजूला घेतली...
नशीब डोक्यावर शिरस्त्राण (लोखंडी टक्कल) होतेच.
सविनय पणाचा आव आणत दुचाकी बरोबर एका कोपऱ्यात साईड स्टॅंडला लावली व चालत साहेबांकडे येत असतानाच परवाना काढण्यासाठी मागच्या खिशातले पाकीट काढले...
रस्त्यात ५०० रुपयाची नोट सापडल्यासारखे हसू चेहऱ्यावर आणत साहेबांना खास आवाजात व एक हात उंचावून मराठमोळा नमस्कार केला.
साहेब चांगलेच खत्रुट वाटत होते - नमस्काराचे प्रत्युत्तर तर सोडाच साधे लक्षही देण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही. जेव्हा खात्याचे सौजन्य सप्ताह कसा पाळावा ह्यावरचे प्रशिक्षण दिले जात होते तेव्हा बहूदा ते त्या वर्गाला गैरहजर राहिले असावेत अशी शंका डोक्यात आली.
भारीतला रे~बॅन चा सोनेरी दांड्यांचा काळा चष्मा, फटफटीवर विसावलेल्या हाताच्या बोटांतल्या चमकत्या अंगठ्या साहेबांच्या सुखवास्तू पणाची साक्ष देत होत्या.
"नंबर प्लेट बदलून घ्यावा - मऱ्हाटीत न्हाय चालायची"
साहेब लोकं सगळं बदलतील पण आपली गावरान भाषा नाही बदलायचे !
"बरं साहेब" इतकेच बोलून मी हातातले परवाना पत्र न मागता त्यांच्या समोर धरले.
"ह्या वेळी वॉर्नींगवर सोडा साहेब, लगेच बदलून घेईन नंबर" मी काकूळतीला येऊन बोललो...
"त्यासाठी न्हाई थांबवले, तुमी सिग्नल जम्प केलाय" साहेब गुरगुरले.
मी अवाक झाल्याचा आविर्भाव चेहऱ्यावर आणला व म्हणालो " पण तो तर पिवळा होता तेव्हा"
"मग काय झालं ? पिवळा होता म्हंजी स्पीड कमी करायचा हा रुल हाय हे माहित हाय का तुमाला ?"
साहेबाने आता कायद्यावर बोट ठेवले.
मी गप्प बसून १०० रुपयांची पावती फाडून परवाना बटव्यात टाकून निघायला वळलो...
"ह्या पुढे लाइफ मध्ये लक्षात ठेवा- पिवळा दिवा दिसला की स्पीडवर कन्ट्रोल करायचा"
सल्ला देण्याच्या आवाजात साहेब गुरगुरला.
"हो आठवण करून दिल्याबद्दल व सरकारी तिजोरीत १०० रुपये जमा करवून घेतल्याबद्दल आभारी आहे"
असा तिरकस टोमणा साहेबाला मारून मी कामावर जायला परत निघालो.
**************************************
ह्या घटनेला चांगला महिना उलटला असेल...
एका क्लायंट कडे ब्रेकडाउन दुरूस्ती करताना एका रुग्णाशी चाललेले त्यांचे संभाषण कानावर पडले.
विषय होता तेलकट तिखट खाण्याचा व आतड्यांवर त्याच्या झालेल्या परिणामांचा.
आमचे हे साहेब हिंदीत सांगत होते - " याद रखीये इसके आगे आप जितना तिखा, तला हुआ खाएंगे वो आपके लिये जहर के समान होगा. यह समजीये की सिग्नल की लाल बत्ती आपको दिखी है और आपको आपकी गाडी अभी उधरही खडी करनी है"
रुग्ण गेल्यावर मला म्हणतात "अरे हा रिक्षावाला होता. जेवणाच्या वेळा पाळत नाहीत, बाहेरचे अरबट चरबट खातात, मग बहूतेकदा पोटाच्या तक्रारी घेऊन येतात"
पण तोवर मला माझ्याकडून सिग्नलला १०० रुपये वसूल करणारे रे~बॅन वाले साहेब आठवले होते.
खरचं जिवनांतल्या एखाद्या क्षणी पिवळा दिवा बघून; योग्य तो इशारा आपण त्यापासून घेतल्यास लाल दिव्याची भिती कधी आपणांस वाटणारच नाही.....