बोलका ढलपा (उत्तरार्ध)

(पूर्वार्धातील गोष्ट- रानात औषधे गोळा करायला गेलेल्या वैद्यबुवांनी एका लाकडाच्या ढलप्यावर संदेश लिहून एका वनवासी मुलाबरोबर घरी पाठवला. संदेशवाहनाचा हा प्रकार पाहून त्या मुलाचे कुतुहल चाळवले. पण त्याला लाकडाचा तो ढलपा पुन्हा पहायला मिळाला नाही. इथून पुढे.....)

रानात राहणा-या त्या मुलाला इतके काकुळतीला आलेले पाहून वैद्यवुवांना त्याची दया आली. ते म्हणाले, "अरे एका ढलप्याचं काय घेऊन बसला आहेस? हे लाकूड, ही माती, हा दगड हे सगळे बोलू शकतात."
"थट्टा करताय् व्हय् माजी? या दगड माती आन् लाकडाला बोलाया त्वांड हाये का ऐकाया कानं हायती?" तो अविश्वासाने बोलला.
वैद्यबुवा समजावणीच्या सुरात म्हणाले,"चल बाहेर, आपण अंगणात बसू म्हणजे मी तुला व्यवस्थित समजावून सांगतो." येतांना त्यांनी तांब्याभर पाणी आणून अंगणाच्या एका कोप-यात शिंपडले. त्यामुळे तिथली धूळ खाली बसून माती थोडी ओलसर झाली. वैद्यबुवा म्हणाले,"तुझं म्हणणं बरोबर आहे. ही जमीन आपल्याबरोबर तोंडानं बोलणार नाही की तिच्या बोलण्याचा आवाज आपल्या कानाला ऐकू येणार नाही. पण आपण जे बोलतो ते हिच्यावर हाताच्या बोटांनी लिहू शकतो आणि नंतर ते डोळ्यांनी वाचू शकतो."
"म्हंजे वं काय?" साक्षरता काय असते तेच त्या बिचाऱ्याला माहीत नव्हते.
"मी आत्ता दाखवतो तुला." वैद्य म्हणाले. त्यांनी पुढे विचारले, "तुझं नांव काय आहे ते सांग बघू."
उत्तर आले,"रामू "
"तुझ्या घरी आणखी कोण कोण असतं ?"
"माजी आई, बापू, माझा भाऊ विनू आणि भन पारू "
तो मुलगा जसजसे एक एक नांव सांगत होता तसतसे वैद्य ते हातातील काटकीने ओल्या जमीनीवर लिहीत गेले.
"फक्त आपण दोघेच या इथे आहोत ना? म्हणजे ही नांवे आणखी कुणीही ऐकलेली नाहीत. बरोबर?"
"हो."
"जमीनीवर मी मारलेल्या या रेघोट्या तुला दिसताहेत ना? तू सांगितलेली सगळी नांवे त्यात मी लिहून ठेवली आहेत."
वैद्यांनी आपल्या मुलाला हांक मारून घरातून बाहेर बोलावले. तो अंगणात आल्यावर त्याला जमीनीवर लिहिलेले वाचायला सांगितले. त्याने घडाघडा सगळी नांवे वाचून दाखवली.
वैद्य पुढे म्हणाले, "असं बघ, तू बोललास ते मला ऐकू आलं आणि मला समजलं. हो ना ?"
"हो."
"तसंच या जमीनीवर मी लिहिलेलं या पोरानं वाचलं, म्हणजे इथं काय लिहिलंय् ते त्याला समजलं. म्हणजे आवाज न करता जमीन त्याच्याशी बोलली असंच नाही कां? "
मुलाला खूप मजा वाटली. म्हणाला, "खरं हाय."
वैद्यबुवा पुढे म्हणाले, "तुला दिलेल्या ढलप्यावर असंच मी जे लिहिलं होतं ते माझ्या बायकोनं वाचलं आणि मला काय पाहिजे होतं ते तिला समजलं. यात आणखी एक गंमत आहे. पण ती सांगायच्या आधी मी तुला चार नांवं सांगतो. ती नीट ऐकून घेऊन ध्यानात ठेव."
"सांगा."
"श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी "
"ही कुनाची नांवं हायती ?"
"तुला कृष्ण भगवानाची गोष्ट माहीत आहे?"
"न्हाई बा. पन आमच्या पाड्यातला किसना बरीक लई द्वाड हाय."
"अरे कृष्णाला लहानपणी गोपाळकृष्ण म्हणायचे. तो पण लहानपणी खूप खोड्या करायचा. आमच्या गांवातलं देऊळ पाहिलं आहेस ? त्यात भिंतीवर गोपाळकृष्णाचं चित्र काढलं आहे."
"म्हंजी त्यो असा पाय वाकडा करून पावा वाजवीत उभा हाय तेच ना ? मला किसन देव म्हाईत हाय. फकस्त त्याची गोष्ट म्हाइती न्हाय."
रामूने कृष्णाची 'देहुडाचरणी वाजवितो वेणू' मुद्रा करून दाखवली. शिकलेला नसला तरी त्याची निरीक्षणशक्ती चांगली होती.
"हां तोच कृष्ण. त्याची कोणती नांवं मी तुला सांगितली ते आता सांग बघू."
"शिरीकिशन, आनखीन झालंच तर हरी, मुरारी पन व्हतं, आनखी काय व्हतं कां ?" 
वैद्यबुवा म्हणाले, "विसरलास ना? आणखीन एक नांव गोविंद पण होतं. अरे असंच होतं. बोललेलं आपण फक्त एकदाच ऐकतो आणि थोड्या वेळानं ते विसरून जातो. पण लिहिलेलं पुन्हा पुन्हा वाचता येतं. हे पहा तू सांगितलेलं इथं लिहिलं आहे, रामू, आई, बापू, विनू आणि पारू. बरोबर?"
"हो."
"मी काढलेल्या या रेघोट्यांना अक्षरं म्हणतात. जे टिकून रहाते ते अक्षर असा त्याचा अर्थ आहे."
"पण हे लिहिलेलं किती वेळ टिकणार आहे?" रामूने शंका काढली.
वैद्यबुवांनी उत्तर दिलं, "ते फार काळ टिकणार नाही. वाऱ्याने धूळ उडेल, माणसांच्या व जनावरांच्या पावलाने ते पुसलं जाईल, एकादी पावसाची सर आली तर वाहून जाईल. पण जोपर्यंत ते खोडलं जात नाही तोपर्यंत वाटेल तितके लोक ते पुन्हा पुन्हा वाचू शकतील. तोंडाने तू बोललास, मी ऐकलं. इथंच ते संपून गेलं, पण लिहिलेलं थोडा वेळ तरी शिल्लक राहिलं."
"पण त्याचा उपयोग काय?"
"खरं सांगू? नुसतं रोजच्या रोज रानावनात हिंडून, फळे मुळे गोळा करून व पशुपक्ष्यांची शिकार करून पोट भरायला त्याची कांही गरज नाही आणि ते उपयोगी पडत नाही. म्हणूनच तुझ्या घरी कोणी लिहायला वाचायला शिकलं नाही आणि त्यांचं त्याच्याशिवाय काम अडलं नाही. पण माझं तसं भागणार नाही. कारण आजारी माणसाला पाहिल्यानंतर त्याच्यासाठी औषध शोधत फिरून मला चालणार नाही. वेगवेगळ्या रोगांची लक्षणं आणि त्यावरची औषधं आधीच लिहून ठेवलेली असली, ती गोळा करून ठेवली असली तर मला ती गरज पडेल तेंव्हा लगेच देता येतात."
"पण ते लिहिलेलं टिकणार कसं?"
"अरे मी तुला मातीवर लिहून दाखवलं ते फक्त बोलक्या ढलप्याचा अर्थ तुला कळावा एवढ्याचसाठी. तो तुला समजला, त्याचं काम झालं. तसेच तुला दिलेला ढलपा माझ्या बायकोनं वाचला, त्यात लिहिलेली वस्तू माझ्याकडे पाठवून दिली. आम्हाला पाहिजे ते काम झालं. त्यानंतर ते टिकलं नाही तरी हरकत नाही. आपण ज्या वस्तूवर कांही तरी लिहितो ती वस्तू जितका वेळ टिकेल त्यापेक्षा त्याच्यावर लिहिलेलं कांही जास्त वेळ टिकणार नाही. पण तोपर्यंत त्याचा उपयोग होत राहील."
"म्हणजे कसं?"
"आता या आमच्या घराच्या भिंतीवर मी 'श्रीगणेशायनमः' असे लिहून ठेवले आहे. जाता येता जितक्या वेळा मला ते दिसेल तेंव्हा मी ते वाचेन आणि आपोआपच तितक्या वेळा माझा गणपतीला नमस्कार होईल. माझ्या औषधांची नांवे वगैरे या पोथ्यांमध्ये लिहून ठेवली आहेत. त्यासाठी मुद्दाम एका वेगळ्या प्रकारच्या झाडाची मोठी मोठी पाने कापून वाळवून ठेवतात, तसेच कुठल्या कुठल्या पानांचा रंगीत रस काढून त्याने ही अक्षरे काढली आहेत. माझ्या वडिलांना त्यांच्या वडिलांनी दिलेली ही जुनी पोथी त्यांनी मला दिली, म्हणजे ती किती टिकली आहे बघ. अशाच कांही पोथ्या त्यांनी लिहिल्या, आता मी लिहीतो आहे. माझी मुले, नंतर त्यांची मुले ती वाचतील. त्यावरून ते नव्या पोथ्या लिहितील. मात्र या सगळ्या पोथ्या जपून वापराव्या लागतात, काळजीपूर्वकरीत्या सांभाळाव्या लागतात. पण अशा तऱ्हेनं एकदा लिहिलेली माहिती टिकून राहते. एवढेच नव्हे तर त्यात भर पडत राहील. मोठे मोठे राजे आपल्या यशाच्या कांही गोष्टी दगडावर छिणीने खोदून लिहवून घेतात नाही तर तांब्याच्या पत्र्यावर कोरून घेतात. त्या इकडे तिकडे पडल्या तरी त्यांना कांही होत नाही. तो राजा मरून गेल्यानंतर सुद्धा त्याने काय केलं किंवा काय सांगितलं हे नंतरच्या लोकांना पिढ्यान पिढ्या ते वाचून समजतं. तसेच रामाच्या, कृष्णाच्या आणि अशा अनेक देवांच्या गोष्टी पूर्वी होऊन गेलेल्या मोठ्या लोकांनी लिहून ठेवल्या आहेत. त्यांवर गाणी रचून ती लिहून ठेवली आहेत. आपले शास्त्रीबुवा त्या वाचून दाखवतात, त्याचा अर्थ समजावून सांगतात. ते वाचून व ऐकून आपल्याला शहाणपण येतं. पूर्वी कोणच्या प्रसंगी कोण कसे वागले होते ते समजतं. असे खूप उपयोग आहेत."
"मला बी शिकवा की लिहायला." रामू उत्याहाने म्हणाला.