तुजवाचुन या संध्याकाली अर्धा अर्धा अर्धासा मी
मि न मी आहे, मज जाणवतो परका परका परकासा मी!
हा वाऱ्याचा निस्तब्धपणा, ही चिमण्यांची चिवचिव नुसती
मी यातत्यात,मी सैरभर, असलेला अन् नसल्यासा मी!
ना गंध तुझा अवतीभवती ना सभोवताली ऊब तुझी
ही गार हवा ना मजसाठी, रक्तातुनही थिजल्यासा मी!
त्या जागी आता नसशील तू अन् तरीही मी येतो आहे
तुजकडे यायच्या वाटेवर हा गोलगोल चकवासा मी!
-गणेश एस्.एम्.