झेंडा

खिन्न तांबड्या क्षितिजावरती मूक काळिमा पसरत जातो
आठवणींच्या दोराला मग रिता पोहरा लटकत जातो

छातीमधल्या तंबोर्‍याच्या सार्‍या तारा सुटून जाती
अहिरभैरवी निरोप देउन दूत सुरांचा भटकत जातो

पोट रिकामे ढगांचेच जर - आभाळा रे, खा 'ती' माती -
धरतीवर ज्या कोळपलेला कोंभ कोवळा टपकत जातो

नाही तारा, नसे हिराही - आगळ्याच त्या अंतर्ज्योती
अशनी माझा जिवंत झाला - पहा लयाला चमकत जातो

उकंड्यातल्या फडक्याला त्या मिंध्या चिंध्या ठिगळत जाती -
कुणा कळावे कशाकशाचा येथे झेंडा फडकत जातो?