या कवितेचं शीर्षक दुर्दैवाने आठवत नाही. ही आमच्या पाचवीच्या पुस्तकात होती. विलक्षण सुंदर शब्द आणि ओघवता सुरेख नाद यामुळे ती लक्षात राहिली आहे. एखाद-दोन कडवी हरवली असण्याची किंवा मागेपुढे झाली असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही(चूभूदेघे हे वेसांनल!) सहज आठवली म्हणून येथे देत आहे.
कवी आहेत बाकीबाब बा. भ. बोरकर.
हिचं शीर्षक कोणी सांगू शकेल का?
कविता अशी आहे :
बोला कुणाकुणा हवे
फुलपाखरांचे थवे
जादूगार श्रावणाच्या
कर्णकुंडलीचे दिवे
निळे जांभळे तांबडे
जर्द पिवळे हिरवे
काळे पांढरे राखेरी
भुरे पोपटी पारवे
कुणी मख्मली मल्मली
कुणी वर्गंडी वायली
किनखापी मुलायम
कुणी शीतल सायली
कुणा अंगी वेलबुट्टी
चित्रचातुरी गोमटी
इंद्रधनूचेही वर्ण
होती पाहून हिंपुटी
वर्णलाघवाचे थवे
जाती घेत हेलकावे
कधी थांबून पुसती
फुलापानांची आसवे
कधी पिकलेल्या साळी
कधी साळकांची तळी
कधी लालगुंज रस्ता
जाती लंघून मंडळी
त्यांच्या लावण्याने दुणा
येथे श्रावणाचा हर्ष
अशा मोसमी गोव्यात
खरेच या एकवर्ष
पण धरायचा त्यांना
फक्त करावा बहाणा
सुखे बघत रहावा
सप्तरंगांचा तराणा
--अदिती