मुंबई गोवा महामार्गावरच्या पनवेल आणि पेणच्या मध्ये थम्स अप च्या अंगठ्याच्या आकाराचा एक सुळका आकाशात डोकावत असतो. पुण्याहून मुंबईला येतांनाही पनवेलच्या अलीकडे डाव्या हाताला दिसतो. हाच तो कर्नाळ्याच्या किल्ल्यावरचा जैत रे जैत ने प्रसिद्धी मिळालेला सुळका. याच्या पायथ्याशी एकेकाळी दिमाखदार आणि नांदते असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे.
शनिवार, २१ एप्रिल. प्रसाद आणि वैभवच्या मैफिलीला जायचे आणि तसेच थेट निघायचे असे ठरले होते. एक सुंदर मैफल मनात घोळवतच रात्री साडेनऊच्या सुमारास कूल, आरती आणि फदिसह पनवेलकडे निघालो.नंदिनी आठ वाजल्यापासूनच पनवेलला येऊन थांबली होती. तिला घेऊन, वासुदेव बळवंत फडक्यांचे शिरढोण ओलांडून कर्नाळा अभयारण्याशी मध्यरात्री पोहोचलो. जिथे थांबत होतो तिथेच लुटारूंपासून सावध राहा, गाडी थांबवू नका अशा सूचना कवटीच्या चित्रासह बघून हबकलोच. त्यात मुंबईहून येणारे तीन जण आले नाहीत, आणि मनोज, कीर्ती सकाळी येणार होते. म्हणजे उरलो आम्ही पाच जणच, कर्नाळ्याला बऱ्याचदा आलेल्या सुमितचा अभयारण्याबाहेरून जाणारी वाट शोधायला सल्ला घेतला. अभयारण्यातून जाणारी वाट सरळ होती, पण तिथून रात्री जायला परवानगी नाही हे माहीत होते. थोडा वेळ शोधाशोध करून शेवटी पहाटे वर जायचा निर्णय घेतला.
ट्रेक सुरू केल्यापासून एक फार मोठा फायदा झाला आहे, राहायचे कुठे असा प्रश्नच पडत नाही. आम्ही अगदी सराईतपणे जवळचे कुठलेही एखादे गाव आणि त्यातले पाठ टेकता येईल इतपत देऊळ वा शाळा शोधून बिनदिक्कतपणे मुक्कामच ठोकतो. त्या काळापुरत्या का होईना गरजा एकदम कमीच होऊन गेल्या आहेत. महामार्गाने तसेच पुढे जात एक बळवली नावाचे गाव गाठले. तिथे गावाबाहेर व्याघ्रेश्वराचे एक छान ऐसपैस देऊळ शोधून रात्री एकच्या सुमारास लगेच पथाऱ्या पसरल्या.
पहाटे साडेपाचला उठून लगेच कर्नाळा पायथा गाठला आणि अभयारण्यातल्या वाटेने चढाई सुरू केली. जवळ जवळ अर्धा रस्ता उत्तम जंगल आहे त्यामुळे उन्हाळ्यातही जाता येईल असा किल्ला आहे, वाट सुळक्याच्या डाव्या बाजूच्या धारेला येऊन मिळते आणि मग आपण उजवीकडे वळून सुळक्याकडे चढू लागतो. वातावरण ढगाळ होते, त्यामुळे नंतरही फारसे ऊन नाही जाणवले कुठे. हा धारेवरचा मार्ग पूर्व आणि पश्चिमेचे छान देखावे दाखवत राहतो. माणिकगड आणि त्याचा बाजूचा सुळका तर एकदम जीवधन - खडा पारशासारखेच दिसतात या कोनातून. प्रवेशद्वाराच्या अलीकडेच कर्णाई देवीचे देऊळ होते. वाचीव माहितीवर विश्वासून मी आधी रात्री याच देवळात मुक्काम करण्याचा बेत आखला होता, पण प्रत्यक्ष देऊळ पाहून तिथे आम्हा सर्वांना थोडीशी दाटीवाटीच झाली असती असे वाटले कारण देऊळ दोन फूट बाय दोन फूट बाय दोन फूट एवढेच होते.
कर्नाळ्यावर बरेच बुरूज, त्यातले दरवाजे आणि बांधकामे आहेत. मधोमध सुळका आहे आणि त्याच्या पोटात मोठमोठी टाकी आहेत. आणि कपाऱ्यात तीच प्रसिद्ध मधमाश्यांची पोळी लटकली आहेत. ५० मीटर उंच अशा या सुळक्यावर प्रस्तरारोहण करून जाता येते. दक्षिणेकडे एक सुटा पहाड कौशल्याने बांधकाम करून किल्ल्याला जोडून घेतला आहे. ते कसब बघण्यासारखे आहे. तासाभरात किल्ल्याची प्रदक्षिणा करून पुन्हा खाली उतरू लागलो. जंगल बरेच जुने असल्याने वाटेत बऱ्याच मजबूत वेली आपली टारझनसारखी लोंबकळण्याची हौस भागवून घ्यायला उपलब्ध आहेत. गंमत म्हणजे या पक्षी अभयारण्यात पहाटे केवळ एक पक्षी दिसला. तासाभराची छोटी चढाई, झाडे, गारवा यामुळे हे सहलीला यायलाही चांगले ठिकाण आहे.
पायथ्याशी मनोज आणि कीर्ती वाटच बघत होते. महामार्गावरच हॉटेल कर्नाळा आहे, तिथे उत्तम न्याहारी केली. आशा भोसलेपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेक नामवंतांचे तिथे स्तुतिपर अभिप्राय लावले होते. पदार्थही क्षणभर विश्रांतीपेक्षा फारच चांगले होते.
प्रवास सुरू केला. नंदिनीचे कथाकथन ऐकत पुन्हा पेणच्या दिशेने जात बळवली गाठले, बळवलीला डावीकडे वळलो, गाव संपताच मातीचा कच्चा रस्ता सुरू झाला आणि टेकाडांवरून वळणे घेत घेत सात किमी नंतर सांकशीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बद्रुद्दिन दर्ग्यापाशी पोहोचला. जसे साधारणातः नेहमी बघायला मिळते त्याप्रमाणेच तिथली पुरातन मंदिरे भ्रष्ट करून त्यांच्याच शिळा वापरून हा दर्गा उभारला आहे, अतिक्रमण हळू हळू वाढवत मोठमोठी बांधकामे उभी केली आहेत. आत मुक्कामाला मुस्लिम बांधवांची बऱ्यापैकी गर्दीही होती. सांकशीच्या किल्ल्यालाही आजूबाजूच्या गावातले लोक आता बद्रुद्दिनचा किल्ला म्हणू लागले आहेत.
वर किल्ल्यापर्यंत एक छोटी पाईपलाईन टाकून किल्ल्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण टक्क्यांतले सारे पाणीही खाली आणून या बांधकाम आणि इतर उपयोगासाठी वापरले जात आहे आणि टाकी कोरडी करून टाकली आहेत. त्या पाइपच्या कडेने जाणाऱ्या पायवाटेने वर निघालो. आता मात्र ऊन चांगलेच भाजून काढत होते. किल्ला काही फार उंच नाही, अर्ध्याच तासात माथ्यावर पोहोचलो, किल्ल्यावर काही फारशी तटबंदी, बुरुज अथवा बांधकाम नाही. सांकशीचे वैशिष्ट्य लेण्यांसारखी कोरून काढलेली गुहांमधली पाण्याची टाकी. शेवटच्या टप्प्यातच ही टाकी सुरू होतात, काही जोडटाकी आहेत, तर काहींमध्ये कोरीव खांब आणि झरोके आहेत, काही एकाच्या डोक्यावर एक आहेत. माथ्यावर आलो आणि सुसाट वारे अंगाला भिडले. टळटळीत उन्हातही एकदम थंड वाटले. गडमाथ्यावरही जिथे जागा मिळेल तिथे टाकी खोदली आहेत, त्याशिवाय गोल चौकोनी असेही कितीतरी खड्डे त्या पाषाणात खोदले आहेत. टाक्या आणि गुहांचे हे गुढरम्य संमेलन हेच या गडाचे एकमेव वैशिष्ट्य आहे. पश्चिमेकडे नजर फिरवली तर मध्ये एकाही डोंगररांगेचा अडथळा नसल्याने धरमतरची खाडी आणि समुद्राचेही दर्शन घडते. माणिकगड आणि कर्नाळाही दिसत असतातच.
सर्व गुहांमध्ये यथेच्छ डोकावून खाली उतरलो, बळवलीत कारल्याचे बरेच वेल होते. एका शेतातून कारले खरेदी झाली. परतीच्या प्रवासात एक ट्रेलर उलटल्याने गोवा महामार्ग ठप्प झाला होता. मग रसायनी आपटा मार्गे पनवेल गाठले, हाही खूप छान रस्ता आहे, नदीच्या कडेने आहे, पण नदीत रसायनीचे पाणी सोडले आहे हे लक्षात घेऊन पाण्यात उतरायचा मोह टाळला. या रस्त्याने जाताना चंदेरी, प्रबळगड, इर्षाळगड यांचे अगदी इतके मनोरम दर्शन घडते की आम्ही गाडी थांबवून काही काळ न्याहाळत राहिलो.
पुढच्या रविवारी जोडून येणाऱ्या सुट्टीचा लाभ घेत सिंधुदुर्ग जिल्हा दर्शनाला जायचे या उन्हाळ्यातल्या बहुधा शेवटाच्या भटकंतीचे बेत आखतच पुणे गाठले.